✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कृषी विभागातील महिला अधिकारी, कर्मचारी आणि महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत सीएमआरसी यांच्याकरिता तांत्रिक सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमात महिलांसाठी सुरक्षणात्मक कायदे याबाबत ॲडव्होकेट अर्चना ठाकरे यांनी माहिती दिली. यावर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्याप्रमाणे डिजीटल एम्पॅावरमेंट ॲन्ड इक्विलीटी व सायबर गुन्हे याबाबत सुद्धा माहिती देण्यात आली. दुपारच्या सत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व आणि पाककला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
पाककला स्पर्धेत अर्चना गोरे यांनी त्यांच्या विशेष पाककृती नाचणीचे ढोकळे या चविष्ट पाक कृतीसाठी प्रथम क्रमांक मिळवला. उज्ज्वला गुजर यांनी ज्वारी व बाजरीचा मिश्र केक बनवून दुसरा आणि तिसरा क्रमांक सरिता चौधरी यांनी ज्वारी व बाजरीच्या लाह्यांचा कच्चा चिवडासाठी मिळवला.
पाककृतींचे पर्यवेक्षण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.विद्या मानकर, माविमच्या जिल्हा समन्वयक संगिता भोंगाडे, महात्मा गांधी आयुर्वेद कॉलेजच्या आहारतज्ञ डॉ.राखी कलंत्री यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन देवळीच्या तालुका कृषी अधिकारी अश्विनी कुंभार यांनी केले तर आभार तंत्र अधिकारी रश्मी जोशी यांनी मानले. या कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.