या जगात अनेक प्रकारची आंदोलने झाली, पण काही आंदोलने अशी पण झाली ज्या आंदोलना मुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास वाचला. आणि पर्यावरणाचे संरक्षण सवर्धनाचे हे आंदोलन यांच्या नावाशिवाय पुढे जाऊ शकत नाही. इ. स. 1730 मध्ये जोधपूरच्या राजाने भव्य महाल बांधण्या साठी झाडे तोडायची ठरवली. गावातील लोकांनी त्याला विरोध केला. “आमचा धर्म तोडू नका” अशी विनंती केली. सैनिक ऐकत नाहीत पाहिल्यावर गावकऱ्यांनी चक्क झाडांना मिठ्या मारल्या. आता झाडे कापली जातील, तर आधी माणसांना कापावे लागेल. सैनिकांच्या तलवारीने अमृतादेवी बरोबर 363 लोकांचे बळी देखील घेतले. मात्र अखेर राजाला नमते घ्यावे लागले. बिश्नोई लोकांच्या लढ्याने असंख्य झाडांना जीवदान दिले.

किंकरीदेवीचे आंदोलन:- एका दलित शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या किंकरीदेवीचे आपल्या परिसरातील निसर्गाशी, शेतमळ्यांशी आणि पहाडांशी घट्ट नाते जुळले होते. किंकरीदेवीला आपल्या भोवतालच्या परिसरात मानवी हस्तक्षेपामुळे घडवले जाणारे बदल जाणवत होते. तेव्हा हिमाचलमधल्या पहाडांकडे चुनखडीच्या खाणींसाठी खाणमालकांची वक्र नजर वळली होती आणि हिमालयातील अस्थिर भूकवचाचा विचार न करता पहाड खोदायला सुरुवात झाली. या बेफाम खाणकामामुळे भूस्खलनाचे प्रकार वाढू लागले होते, जमिनीवरचे झाडांचे हिरवे छत्र तुटू लागल्याने जमिनीची धूप वेगाने होऊ लागली होती आणि त्यामुळे पहाडातील शेतीवर दुष्परिणाम होऊ लागले होते. निसर्गाचा हा विनाश पाहून किंकरीदेवी अस्वस्थ झाली आणि तिने याविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली.
तिने सिमल्याच्या उच्च न्यायालयामध्ये एकाच वेळी ४८ खाणमालकांविरुद्ध जनहितार्थ खटला दाखल केला. मात्र सत्तेशी लागेबांधे असलेल्या खाणमालकांनी किंकरीदेवी हे सारं केवळ पैसे उकळण्यासाठी करते आहे आणि आम्ही निसर्गाची हानी करत नाही, असा दावा केला. न्यायालयात जेव्हा खटला सुनावणीसाठी येईना, तारखांवर तारखा पडू लागल्या तेव्हा न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी किंकरीदेवीने न्यायालयाबाहेर आमरण उपोषण आरंभले आणि तब्बल १९ दिवसांनंतर न्यायालयाने किंकरीदेवीच्या केसची दखल घेतली, पण तोपर्यंत किंकरीदेवीचे नाव केवळ भारतातीलच नव्हे, तर परदेशातील प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचले होते.
अशीच गोष्ट परत विसाव्या शतकात घडली. 1973 मध्ये अलकनंदा खोऱ्यात मंडल गावात परत ‘चिपको आंदोलना’ला सुरुवात झाली. गावकऱ्यांना गाफील ठेवून अडीच हजार झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार होती. मात्र महिला आणि मुलं झाडाला कवटाळून राहिली आणि झाडांना वाचवलं. ठेकेदारांनी त्या स्त्रियांना विवस्त्र करण्याच्या देखील धमक्या दिल्या, मात्र त्यांचा संघर्ष चालूच राहिला.
गढवालची गौरीदेवी, सिमल्याची किंकरीदेवी, कर्नाटकातील थिमक्का, या सर्व महिलांनी त्या त्या ठिकाणी पर्यावरणाला वाचवण्यासाठी वेळोवेळी अशी आंदोलनं केली. या संघर्षात त्यांच्यासमोर अनेक आव्हानं होती. लिहिता वाचता येत नसताना देखील केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर ही आंदोलनं त्यांनी चालवली. पोटच्या पोरासारखं प्रेम स्त्रियांनी झाडांवर केलं, आणि आज ती झाडं वाचली. या सर्व स्त्रिया आम्हाला प्रचंड बळ आणि प्रेरणा देतात. माणूस बनणं काय असतं, हे शिकवतात.
या लढाऊ आणि प्रेमळ स्त्रियांना मानाचा सलाम.