उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हात क्राईमचा ग्राफ मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते आहे. त्यात चोरी, हत्या, खंडणी, महिला अत्याचार घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस विभाग यावर अंकुश ठेवण्यासाठी जोरदार कारवाई करत आहे. अशाच एका चोरीचा तपास करून घरफोड्या करणाऱ्या 5 जणांना आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
मिरज शहर परिसरात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचे दागिने, रोकड, संगणक असा 6 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींकडून मिरज शहरातील 6 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. महंमद कैस फैयाज मुल्ला वय 20, रा. गुरुवार पेठ, लुमान अजीज गद्यालपटेल वय 22, रा. किल्ला भाग, शाहिद मुनीर गोदड वय 22, रा. टाकळी रोड, फैयाज सिकंदर गोदड वय 19, रा. टाकळी रोड, अरबाज फैयाज वांगरे वय 22, रा. किल्ला भाग, मिरज अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता सांगलीचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी चोरीतील गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी एक पथक तयार केले होते. काही दिवसांपूर्वी बोलवाड रोड परिसरातील एका घरात चोर घुसल्याची माहिती नागरिकांनी निरीक्षक झाडे यांना दिली. त्यांनी पथकाला घटनास्थळी पाठवले. त्यावेळी यातील काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी काही साथीदारांची नावे दिली. त्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी मिरज शहरातील 6 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचे दागिने, रोकड, संगणक आणि त्याचे साहित्य, मॉनिटर, मोबाईल असा 6 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

