पंपसंच, वीज जोडणीसाठी देखील अनुदान पीव्हीसी, एचडीपीई पाईप व परसबागेचा समावेश
✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या डॅा.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेच्या धर्तीवरच आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना राबविली जाते. या योजनेतून नवीन विहीर बांधकामासाठी २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जातात. जुन्या विहीरींची दुरुस्ती, शेततळ्यांचे अस्तरीकरण, ठिबक, तुषार व सुक्ष्म सिंचनाचा देखील लाभ योजनेतून आदिवासी शेतकऱ्यांना दिला जातो.
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आदिवासी समाजातील लाभार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली ही योजना जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाच्यामार्फत राबविली जात आहे. या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना नवीन विहीर बांधकामासाठी शंभर टक्के म्हणजे २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. शेतकऱ्याकडे विहीर असेल आणि ती नादुरुस्त असल्यास केवळ दुरुस्तीसाठी ५० हजार रुपयाचे अनुदान योजनेतून दिले जाते.
इनवेल बोअरिंगसाठी देखील अनुदान दिले जाते. योजनेतून शेतकऱ्यांना बोअरींग करावयाचे असल्यास २० हजार अनुदान दिले जातात. डिझेल किंवा विद्युत पंपसंचसाठी २० हजार, वीज जोडणी आकारसाठी १० हजार, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण करावयाचे असल्यास रुपये १ लाखाचे अनुदान देण्यात येते. सुक्ष्म सिंचन व ठिबक सिंचन संचासाठी प्रत्येकी ५० हजार रुपयाचे अनुदान पात्र शेतकऱ्यांना दिले जाते तर तुषार सिंचनासाठी २५ हजार रुपयाचे अनुदान लाभार्थ्यांस दिले जातात. पीव्हीसी, एचडीपीई पाईपसाठी 30 हजार रुपयांच्या अनुदानाचा समावेश आहे.
या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी अनुसूचित जमाती या घटकातील शेतकरी असावा. शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असावे. शेतकऱ्यांकडे त्यांच्या स्वत:च्या नावे ०.४० हेक्टर व कमाल ६ हेक्टर पर्यंत शेतजमीन असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या नावे जमीनधारणेचा सातबारा व ८ अ उतारा, आधारकार्ड आवश्यक. आधारकार्ड बॅंक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे.
दारिद्यरेषेखालील लाभार्थ्यांस प्राधान्य दिले जाते. लाभार्थी दारिद्यरेषेखालील नसल्यास सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न १ लाख ५० हजाराच्या आत असावे. नवीन विहीरीचा लाभ घेण्यासाठी नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून ५०० फुटाच्या अंतरामध्ये दुसरी विहीर नसावी तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. नवीन विहीरीसाठी यापुर्वी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेतून नवीन विहीरीचा लाभ घेतलेला नसावा.
शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक पिके घेण्यासाठी सिंचन सुविधा उपलब्ध असणे अतिशय महत्वाचे आहे. बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेद्वारे सिंचन सुविधेसाठी अनुदान उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना आपले कृषि उत्पन्न वाढीसाठी मोलाची मदत झाली आहे. योजनेचा लाभ घेतलेले अनेक शेतकरी एकापेक्षा जास्त पिके घेऊ लागले आहे. पर्यायाने त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे.

