विश्वास तिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:- संपूर्ण देशात 76 वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वत्र देशभक्ती पर वातावरण असताना अहमदनगर शहराजवळील ऐतिहासिक व स्वातंत्र्याच्या चळवळीत महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार असलेल्या भुईकोट किल्ल्यात 76 व्या स्वातंत्र्यदिनी युवकांच्या टोळक्याने देशविरोधी घोषणाबाजी केली. या टोळक्यातील ५ जणांना लष्करी जवान व पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील तिघे अल्पवयीन आहेत. अटक केलेल्या दोघा आरोपींचे वकीलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिला. या आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर एका हिंदूुत्ववादी कार्यकर्त्यांने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
अहमदनगर शहराजवळील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सध्या लष्कराच्या ताब्यात आहे. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन अशा राष्ट्रीय उत्सवाच्या वेळी तो नागरिकांना पाहण्यासाठी खुला केला जातो. 15 ऑगस्ट ला दुपारी 3.00 वाजताच्या सुमारास किल्ल्यातील हत्तीदरवाजा भागात, दग्र्याजवळ 5 युवकांच्या टोळक्याने देशविरोधी वादग्रस्त घोषणाबाजी केली. यावेळी येथे बंदोबस्तासाठी असलेले लष्कराचे जवान पवनसिंग, दिलीप भीषण, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन धोंडे, व्ही. एन. राठोड, श्री. पवार, महिला पोलीस एस. बी. साळवे यांनी लगेच तिघांना ताब्यात घेतले. इतर दोघे मात्र पळून गेले. पाचही जणांविरुद्ध आर्मर्ड बेसिक ट्रेनिंग रेजिमेंटचे हवालदार प्रशांतकुमार श्रीचंदेश्वरसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना दि. 19 पर्यंत कोठडी..
देशविरोधी घोषणा देणाऱ्या आरोपींना अटक केलेल्या परवेज इजाज पटेल (रा. अमिना मशीद जवळ, आलमगीर, भिंगार, नगर) व अरबाज शेख (रा. कोठला, नगर) या दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी दिनांक 16 बुधवारी दुपारी वरिष्ठस्तर सहदिवाणी न्यायाधीश व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विनोद डोंगरे यांच्यापुढे हजर केले. सायंकाळी या दोघा आरोपींना 19 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांनी सांगितले. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालयाच्या आवारात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

