🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य तसेच आरोग्य उपकेंद्र या सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना पुर्वी शुल्क द्यावे लागत होते. आता या सर्व रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना विनामुल्य 32 प्रकारच्या सेवा उपलब्ध होणार आहे. त्यात बालकांपासून तर जेष्ठांपर्यंतच्या विविध सेवांचा समावेश आहे.
शासकीय रुग्णालयांमध्ये विविध रक्त तपासण्या, सोनोग्राफी, ईसीजी, एक्सरे, सीटी स्कॅन या सारख्या चाचण्या मोफत होत असल्याने त्याचा फायदा रुग्णांना होत आहे. दिनांक 1 सप्टेंबर पासून केंद्र शासनाची महत्वाकांक्षी आयुष्मान भव या उपक्रमाची सुरुवात झाली असून 31 डिसेंबर पर्यंत ही आरोग्य विषयक मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये आबालवृद्धांच्या आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील 18 वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी विशेष मोहीम राबवून करण्यात येणार असून गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची 32 सामान्य आजाराची वेळेवर तपासणी करून उपचार करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास जिल्हा रुग्णालय स्तरावर शस्त्रक्रीये साठी संदर्भित करण्यात येईल.
शासकीय रुग्णालयांमध्ये मधुमेह, कॅन्सर (तोंड), गर्भाशय मुख, स्तनाचा कर्करोग याबाबत तपासणी तसेच क्षयरोग, कुष्ठरोग व इतर सांसर्गिक आजार, माता व बाल आरोग्य, संतुलीत आहार व लसीकरण, नेत्र चिकित्सा याबाबत चार आठवड्यात तपासणी करण्यात येणार आहे. वैद्यकिय महाविद्यालयाच्या माध्यमातून आठवड्याला किमान एक आरोग्य मेळावा घेतल्या जाईल.
आयुष्मान भव उपक्रमांतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवारी किंवा रविवारला असांसर्गिक आजाराच्या तपासण्या करण्यात येणार असून निरोगी राहून लोकांची क्रयशक्ती वाढविण्याचा यातून उद्देश येतो. आयुष्मान भव उपक्रमांतर्गत आरोग्य विषयक सेवा सुविधाची जनजागृती करण्याकरीता ग्रामपंचायत, ग्राम आरोग्य पोषण समितीमार्फत आयुष्यमान कार्ड, आभा कार्डबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल लसीकरण, क्षयरोग, कुष्ठरोग व इतर आरोग्यातील योजना व मोहिमेबाबत जनजागृती केली जाणार आहे.
सर्व वयोगटातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा देण्याकरीता राष्ट्रीय आरोग्य अभियानतंर्गत आयुष्मानभव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त नागरीकांनी आभा कार्ड काढावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रा. ज. पराडकर यांनी केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

