महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जालना येथील युवकाने मुंबईत आत्महत्या केली. सुनिल बाबुराव कावळे रा. चिकनगाव ता. अंबड जि. जालना असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. आता पण मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. त्यात एका तरुणाने आरक्षणासाठी खळबळजनक पाऊल उचलले असल्याने संपूर्ण राज्यातील मराठा समाजात मोठ्या प्रमाणात संताप दिसून येते आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी:
मृतक सुनिल कावळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार पानांची चिठ्ठी लिहिली आहे. महाराष्ट्राचे कुळदैवत तुळजाभवानीमाता, हिंदूधर्म रक्षक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा… जय भवानी… शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या भविष्याचा प्रश्न आहे. मराठी शेतकरी, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे. या मुंबईमध्ये सणवार काय येत राहतील, जात राहतील.
सर्वांना मुंबईत येण्याचं केलं आवाहन- संपूर्ण महाराष्ट्रातून मराठ्यांनो २४ ऑक्टोबरला मुंबईत या… आता ही लढाई जिंकायची आहे. शाळेतील मुल-मुली या कॉलेजमधील या…चार दिवस शाळेत गेला नाहीतरी काही फरक पडत नाही. पण आता ही लढाई आरपार आहे. मला माफ करा…, आता एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा… लाख मराठा…, आता कोणत्या नेत्याच्या सभेला जायचंच नाही, हा लढा गरजवंताचा, लढा नीतीवंत मराठ्यांचा आणि लढा शौर्यवंताचा असल्याचं आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलयं. मला मोठ्या मनानं माफ करा. मी क्षमा मागतो. सर्वांनी माफ करा, असेही आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.
मृताचे नातेवाईक मुंबईत दाखल.... मृतक सुनिल कावळे यांचा मृतदेह सायन रुग्णालयात आणण्यात आला. सध्या जालन्याहून कावळेंचे नातेवाईक आले आहेत. मृताची ओळख तसेच अन्य प्रक्रिया रुग्णालयाकडून सुरू असल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली आहे. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात येईल असंदेखील सांगण्यात आलं आहे.
आत्महत्या करणारा तरुण मराठा आंदोलनात होता सक्रिय- मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी मराठा तरुणानं आत्महत्या केल्यानंतर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, हुतात्मा सुनील बाबुराव कावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सुनील बाबुराव कावळे हा युवक सक्रिय होता. त्यानं मुंबईत आत्महत्या केली. मात्र, आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. माझ्या मराठा बांधवांनो, काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीनं यापूर्वी इतिहासात जिंकले आहेत.

