मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम आरेवाडा येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामा बाबत माजी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या पुत्र व विद्यमान आदिवासी महिला सरपंचाचे चांगलाच वाद वाढला आहे.
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम आरेवाडा येथील ग्रामपंचायत मध्ये पाच कोटींच्या विकासकामा वरून एका माजी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या मुलाने आदिवासी समाजाच्या महिला सरपंचासह सदस्यांना शिवीगाळ करुन धमकावले आहे. याप्रकरणात 28 डिसेंबरला अखेर माजी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या मुलावर भामरागड पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.
आरेवाडा ग्रापंचायतच्या सरपंच सरिता वाचामी व इतर सदस्यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार, अहेरी येथील जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांचा मुलगा शुभम कुत्तरमारे याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला.
आरेवाडा ग्रामपंचायतीत आदिम जमाती संरक्षण तथा विकास कार्यक्रम अंतर्गत आलेल्या पाच कोटींची विकास कामे मंजूर आहेत. अहेरी येथील एका हॉटेलात 21 डिसेंबरला शुभम कुत्तरमारे याने कामे करण्यावरुन सरपंच सरिता राजू वाचामी व इतर सर्व सदस्यांना जातिवाचक शिवीगाळ करित जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर २२ डिसेंबरला आरेवाडा ग्रामपंचायतीत मासिक सभा सुरु होती. यावेळी तेथे येऊन शुभम कुत्तरमारे याने पुन्हा जातिवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. अखेर 28 डिसेंबरला सरिता वाचामी यांच्या फिर्याद वरुन शुभम कुत्तरमारे विरोधात ॲट्रॉसिटी व धमकावल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
उलट सरपंचांविरोधातच आरोपीची तक्रार.
शुभम कुत्तरमारे याने महिला सरपंच व सदस्यांना दोनवेळा जातिवाचक शिवीगाळ करुन उलट सरपंच सरिता वाचामी व सदस्यांविरोधात तक्रार अर्ज दिला. यात माझ्याविरुध्द हे सर्व जण ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद करु शकतात, असा दावा करुन स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याचा बनाव ओळखला व त्याच्या विरोधातच गुन्हा नोंदवून दणका दिला.

