विद्यार्थ्यांनी टॅबलेटचा सुयोग्य वापर करुन परिक्षांमध्ये घवघवीत यश संपादीत करावे: आमदार समिर कुणावार
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा,दि.15:- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येते. योजनेंतर्गत जेईई, नीट, एमएचटी -सेट चे परिक्षा पुर्व प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी टॅबलेटचा वापर करुन परिक्षांमध्ये घवघवीत यश संपादीत करावे, असे मनोगत आ. समिर कुणावार यांनी परिक्षा पुर्व प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना टॅबलेट व सिमकार्डचे वितरण कार्यक्रमात केले.
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतीगृह येथे जेईई, नीट, एमएचटी-सेट चे परिक्षा पुर्व प्रशिक्षणा करीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत टॅबलेट व डाटा सिमकार्डचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी उपस्थित होते.
या योजनेंतर्गत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विशेष करुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जेईई, नीट, एमएचटी-सेट सारख्या परिक्षांना सामोरे जाण्यास मदत होईल असे पुढे बोलतांना समिर कुणावार म्हणाले. यावेळी मान्यवरांचे हस्ते 23 विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटासिमकार्डचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रविण मेश्राम यांनी तर आभार सुरज छाडी यांनी मानले. कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

