मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गडचिरोली येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या जवानाने सकाळी 11.30 सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. उत्तम किसनराव श्रीरामे वय 32 वर्ष, रा.
देगलूर नांदेड असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.
मृतक उत्तम किसनराव श्रीरामे याने आत्महत्येपूर्वी त्यांनी ‘माणूस मरतो पण आत्मा अमर आहे ‘ असा स्टेटस व्हॉटस्अपला ठेवले होता. गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या उत्तम यांचा 3 वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतक उत्तम त्यांनी यापूर्वी पुणे येथील राज्य राखीव दलाच्या गट क्र.1 मध्ये सेवा बजावली होती. सध्या तो गडचिरोली जिल्ह्यातील शिखरदीप या जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते.
मृतक उत्तम श्रीरामे मागील काही दिवसांपासून तो तणावात असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास ड्युटी संपल्यावर बंगल्यातीलच विश्रामगृहात खाटेवर झोपून स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून घेतली आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या शासकीय निवासस्थानी ही आत्महत्येची थरारक घटना घडली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या शिखरदीप बंगल्यातून अचानक जोरदार गोळीबार झाल्याचा आवाज आला. त्यानंतर इतर सुरक्षा रक्षक आणि इतरांनी हा आवाज कोठून आला हे बघण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी उत्तम रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. या घटनेआधी काही वेळापूर्वीच जिल्हाधिकारी संजय मीणा हे सुटीवरून बाहेर गावाहून गडचिरोली येथे आपल्या शासकीय बंगल्यात पोहोचले होते.
या घटनेनंतर जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी गडचिरोली पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

