प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.21:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार असून भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा ठरवून दिलेली आहे. उमेदवारांच्या खर्चाची तपासणी व देखरेख ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून निवडणुकीच्या कालावधीत मोठ्या रक्कमेच्या व्यवहारांवर बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांच्या निवडणूक खर्च विषयक नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी सुरज बारापात्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
बँकेमधून दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास बँकांनी तात्काळ आयकर विभागाला माहिती द्यावी. मागील वर्षभरात अवैधपणे मद्य बाळगणे व वाहतुकीचे गुन्हे दाखल असलेल्यांची यादी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार करावी त्यासोबतच अवैधपणे मद्य बाळगणे व वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्ष व उमेदवाराचा होणारा खर्च दैनंदिन नोंदविणे आवश्यक आहे. सभा, प्रचार साहित्य, वाहन, अतिमहत्वाच्या नेत्यांच्या सभा, पोस्टर, बॅनर आदींचा खर्च निवडणूक खर्चात नोंदविणे गरजेचे आहे. बँकामधून मोठ्या प्रमाणात रोख काढल्या गेली असल्यास त्याचीही चौकशी करण्यात यावी. निवडणूक काळात उमेदवारांनी बँक खात्यातून काढलेल्या रकमेचा तपशिल तपासून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. याबैठकीला आयकर विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तसेच बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

