अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सध्या महाराष्ट्रात निवडणूकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. त्यासाठी नेत्यांच्या सभाही होत आहे. परंतू एक तासाच्या सभेसाठी २४ वर्षाआधी लावलेले ६०, ७० फुट उंचीचे निलगिरीचे मोठे झाड तोडण्यात आले असल्याने शहरातील अनेक वृक्ष संवर्धन प्रेमी मध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हिंगणघाट येथील रा. सू. बिडकर महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या परिसरातील २४ वर्ष वयाचे मोठे झाड सभेला येणाऱ्या नेत्याचे हेलिकॉप्टर उतरविण्या करीता तोडण्यात आले. संबधीत अधिकाऱ्यांना यावर विचारणा केली असता वरच्या अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत असल्याचे सांगण्यात आले. पण त्या वेळी वरच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता कोणीही फोनला उत्तर दिले नाही.
परंतू पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी तक्रार ऐकून घेतली. वृक्षतोड थांबवून ठेवल्यानंतर मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन वरच्या अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत असल्याचे सांगून वेळ मारून नेली. नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी हिंगणघाट शहरात २७ जागा उपलब्ध होत्या परंतू नेमकी हीच जागा निवडण्यात आल्याने सत्तेपुढे शहाणपण चालत नसल्याचा प्रत्यय आला.
सध्या टिव्हीवर,सोशल मीडिया वर राजकीय बातम्यांच्या व्यापामुळे महाराष्ट्रातील वाढते तापमान, पिण्याच्या पाण्याची समस्या या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे. पुढील १५ दिवस सुर्य आग ओकणार असल्याच्या बातम्याही अधूनमधून येत आहे. परंतू निसर्गाच्या हाकेकडे आपण डोळेझाक करून अशाप्रकारे शुल्लक कारणासाठी वृक्ष कत्तल करत असल्याने पर्यावरणवाद्यांचा तिव्र संताप होत आहे. या वृक्ष तोडीचा पर्यावरण संवर्धन संस्था व सर्व वृक्ष प्रेमींकडून जाहिर निषेध करण्यात येत आहे.

