८७ रक्तदात्यांनी केले रक्तदान अपंगांना तीन चाकी सायकलचे वितरण गरजू रुग्णांकरीता निःशुल्क मेडिकल बेड, व्हीलचेअर आदी वैद्यकीय साहित्यांची सुविधा उपलब्ध
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या पावन-पर्वावर नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व वैद्यकीय साहित्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरात ८७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच गरजू रुग्णांकरता वैद्यकीय साहित्यांचे लोकार्पण करण्यात आले.
स्थानिक बन्सीलाल कटारिया रत्ना विद्यानिकेतन मध्ये आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी परमानंद तापडिया प्रबंधक कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शिवकुमार जी इन्चार्ज ब्लड बँक कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम, डॉ. रमेश राका, अशोक आकडे उपाध्यक्ष पी. वी.टेक्स्टाईल लिमिटेड जाम, भागचंद ओस्तवाल, अध्यक्ष रत्ना विद्या निकेतन, डॉ. अजय कुमार ठाकूर, प्राचार्य संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज कोपरगाव व महेश अग्रवाल अध्यक्ष नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरजू रुग्णांकरीता मेडिकल बेड, एअर बेड, व्हील चेअर, वॉकर, आधार काडी आदी वैद्यकीय साहित्यांचे लोकार्पण करण्यात आले. हे साहित्य गरजू रुग्णांकरता निशुल्क उपलब्ध राहणार आहे. तसेच यावेळी अपंग व्यक्तींना तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना नारायण सेवा मित्र परिवाराचे कार्य अलौकिक असल्याचे सांगून’ नरसेवा हीच ईश्वर सेवा, हे ब्रीदवाक्य नारायण सेवा मित्र परिवाराचे पदाधिकारी व सदस्यांनी प्रत्यक्षात अंगीकारले आहे, असे मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात तापडिया म्हणाले की समाजातील गरजू रुग्णांना वैद्यकीय साहित्याची निकड भासते. परंतु महागडे वैद्यकीय साहित्य ते खरेदी करू शकत नाही. परंतु मित्र परिवाराने ही फार मोठी सुविधा उपलब्ध करून दिली असून हे कार्य खऱ्या अर्थाने ईश्वरीयच कार्य आहे, असे मनोगत व्यक्त केले. सदर या शिबिरात ८७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तसंग्रहणाचे काम कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम व जिल्हा रुग्णालय वर्धा च्या चमुनी केले. प्रास्ताविक गौतम कोठारी तर संचालन पराग मुडे व दुर्गाप्रसाद यादव यांनी केले. आभार प्रा. किरण वैद्य यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता नारायण सेवा मित्र परिवाराचे पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

