श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच घराणेशाही संपवा असे आवाहन जनतेला करत असतात. हाच शब्द प्रमाण मानून बीडची जनता जिल्ह्यात सुरू असलेली घराणेशाही संपवण्याच्या तयारीला लागली आहे.
बीड लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापू लागलेले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. जिल्ह्यातील राजकीय समीकरणं प्रचंड बदललेली आहेत. राजकीय प्रस्थापितांनी एकत्र येत कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या स्वकृत्वावर मोठ्या झालेल्या व्यक्ती विरोधात सुरू केलेली ही लढाई आहे. थोडक्यात शेतकरी पुत्र विरुद्ध प्रस्थापित अशी स्थिती जिल्ह्याच्या निवडणुकीतील लढाईचे चित्र आहे. प्रस्थापित राजकीय नेते एका वळचणीला असले, तरी जनता मात्र त्यांच्या पाठीशी नसल्याचे पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका मध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांचा स्वार्थी आटापिटा सुरू आहे. जनतेपेक्षा त्यांच्या प्रश्नांपेक्षा स्वहित पाहणं एवढीच प्रस्थापितांची असलेली दृष्टी मतदारांना चांगलीच खटकत आहे. प्रत्येक वेळी बीडच्या जनतेची मान प्रस्थापितांच्या जोखडात अडकली जाते मात्र प्रस्थापितांनी जिल्ह्याचा विकास कधीच होऊ दिला नाही.
ऊसतोड कामगारांचा जिल्हा आता आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा म्हणून सुद्धा नावारूपाला आला असला तरी याचं कुठलंच सोयर सुतक प्रस्थापित नेत्यांना नाही. मागासलेपणाची ओळख कायम ठेवण्यातच त्यांनी धन्यता मानली,या उपर जनतेवर आम्हीच प्रचंड उपकार केलेले आहेत असा अविर्भाव आणत जनता आपली गुलाम आहे ती आपल्या शब्दापुढे जाणार नाही त्यांना आपल्याशिवाय तरुणोपाय नाही निवडणुकीला उभे राहिलो म्हणजे पुन्हा एकदा त्यांच्यावर आपणच उपकार करत आहोत असा समज प्रस्थापित समजल्या जाणाऱ्या उमेदवाराने करून घेतला आहे. बीडची जनता साधी भोळी चटकन विश्वास ठेवणारी असली तरी विश्वासघात किती वेळेला सहन करायचा यालाही मर्यादा असतात तीच मर्यादा आता ओलांडली गेली आहे. प्रस्थापिताविरोधात शेतकरी पुत्राने हाती घेतलेल्या लढ्याला प्रचंड जन समर्थन मिळत आहे. प्रस्थापिता विरोधात उघडपणे कोणी बोलत नसलं ती हिम्मत करीत नसलं तरी वास्तव चित्र मात्र वेगळं आहे.
दुसरीकडे मोदी समर्थक असलेली जनता देखील प्रस्थापितांच्या घराणेशाहीला आता पुरती कंटाळली आहे. नरेंद्र मोदींनी प्रत्येक वेळी आवाहन करून घराणेशाही संपवा असा संदेश दिला. घराणेशाही संपवण्यासाठीच त्यांनी प्रथापितांची मान जनतेच्या हातात जाणीवपूर्वक दिली आहे. लोकहो तुम्हीच प्रस्थापितांना धडा शिकवा. त्यांना बायकाॅट करा लोकशाहीतील तुमच्या प्रत्येक मताची किंमत यांना कळू द्या असा उदात्त दृष्टिकोन ठेवलेला अप्रत्यक्ष संदेश मोदींनी दिलेला आहे. यामागे राष्ट्रहिताची भावना ठेवून मोदींचे समर्थक देखील घराणेशाही संपवण्याच्या दृष्टिकोनाने कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे या निवडणुकीतील निकालाचे चित्र वेगळे असणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

