संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राजुरा येथील मुख्य सभागृह, प्रशासकीय इमारत येथे आयोजित खरीप हंगाम पूर्व तयारी व मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा विभागीय कृषी सहसंचालक नागपूर शंकर तोटावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेमध्ये त्यांनी खरीप हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध पिकांचे अर्थशास्त्र आणि त्याचा आपल्या उत्पन्नावर होणारा परिणाम अतिशय सोप्या भाषेमध्ये शेतकरी बांधवांना सांगून सोयाबीनच्या अष्टसूत्री द्वारे निश्चित उत्पन्न मध्ये वाढ कशी घडवून आणता येईल याबाबत उपस्थित शेतकरी बांधवांना सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी पारंपारिक पद्धतीमध्ये सोयाबीन लागवड करताना उत्पन्नापेक्षा खर्च अधिक कसा होतो हे पटवून देताना सरांनी अतिशय उत्तम प्रकारे आधुनिक पद्धतीने सोयाबीनची लागवड करून उत्पन्नामध्ये वाढ कशी घडवून आणावी याबद्दल मार्गदर्शन केले.
सोयाबीन अष्टसूत्रीचा वापर करताना बियाणे निवड, उगवण क्षमता तपासणी, बिज प्रक्रिया, बियाणे वाण निवड, सोयाबीन साठी बेड पद्धतीचा वापर, सुयोग्य खोलीवर पेरणी, खतांचा वापर सुयोग्य पद्धतीने करतानाच होणाऱ्या खर्चामध्ये कशी बचत होईल याबाबत सुस्पष्ट मार्गदर्शन केले. यावेळी पारंपारिक पद्धतीने सोयाबीन लागवड करण्यापेक्षा बेड पद्धतीतून सोयाबीन लागवड केल्यानंतर होणारा फायदा शेतकरी बांधवांच्या लक्षात आला.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र एकार्जुना येथील कापूस संशोधन केंद्र शास्त्रज्ञ श्री अमरशेट्टीवार यांनी कापूस पिकाबद्दल सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा वेळी तालुका कृषी अधिकारी विनायक पायघन मंडळ कृषी अधिकारी चव्हाण, श्रीमती मोहितकर, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तथा शेतकरी बांधव तसेच महिला बचत गटांच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

