मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील आलापल्ली वनविभागातील पेडीगुडम वन परिक्षेत्रात एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील चंदनवेली परिसरातील मुखडी गावच्या जंगलात अस्वलासह अन्य एका वन्यप्राण्याची शिकार रविवार 9 जून राेजी करण्यात आली. याप्रकरणी गेदा येथील 7 आराेपींना 11 जून राेजी वनाधिकाऱ्यांनी बेड्या ठोकल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मुल्ला मट्टामी, दिवाकर मरकाम, गणेश मट्टामी, राजू गुंडरू, विजय पदा, नीलेश पदा, काेपा गुंडरू (सर्व रा. गेदा, ता. एटापल्ली) अशी आराेपींची नावे आहेत.
अटक करण्यात आलेल्या या सर्व आराेपींनी मांस खाण्यासाठी अस्वलाची शिकार केली असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. सर्व आराेपींना गुरुवार, 13 जून राेजी अहेरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली.
मुखडीच्या जंगलात अस्वलाची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना वनविभागाच्या पथकाने धाड टाकून अस्वलाचे मांस, डोके व पाय जप्त केले. मात्र, त्यापूर्वी वनविभागाच्या पथकाची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. वन विभागाचे पथक आराेपींच्या मागावर हाेते. दरम्यान, मंगळवार, 11 जून राेजी वन परिक्षेत्र अधिकारी भावना अलाेने व प्रदीप बुधनवार यांच्या पथकाने 7 ही आराेपींना अटक केली. त्यांना 12 जून राेजी न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची वनकाेठडी सुनावली.
वनकाेठडी संपल्यानंतर 13 जून राेजी वन विभागाने आराेपींना पुन्हा न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. अस्वल शिकार प्रकरणाची कारवाई आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुलसिंह टाेलिया यांच्या मार्गदर्शनात वनाधिकाऱ्यांनी केली.
मांसासह तीन बंदुका, तीन माेटारसायकल जप्त. अस्वल शिकार प्रकरणी वनाधिकाऱ्यांनी सातही आराेपींकडून अस्वलाचे मांस, नखे, कातडे, तसेच जाळलेले शेकरूसदृश एका वन्यप्राण्याचा काही भाग जप्त केला. माेठ्या खारीसारखा हा प्राणी आहे. याशिवाय आराेपींकडून तीन भरमार बंदुका, शिकारीसाठी वापरलेले साहित्य तसेच शिकारीसाठी जंगलात जाण्याकरिता वापरलेल्या तीन माेटारसायकल आदी साहित्य जप्त करण्यात आलेले आहे.

