पेरमल्ली आरोग्य केंद्र अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष डॉ. अ निसार हकीम यांची मागणी.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- गडचिरोली जिल्हात आरोग्य विभागाचा हलगर्जी कारभार परत एकदा समोर आला आहे. परत एका खळबळजनक घटनेने जिल्हात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र दिसून येत असल्याने नागरिकात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
24 जून रोजी अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम पेरमिली आरोग्य केंद्रात लाचार आरोग्य व्यवस्थेने एक निष्पाप बालकाचा जीव घेतल्याच्या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. आर्यन अंकित तलांडी वय 4 वर्ष, रा. कोरेली, ता. अहेरी असे या बालकांचे नाव असून याला वेळेत योग्य उपचार तसेच वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न करून दिल्याने या 4 वर्षीय बालकाचा उपचाराअभावी मृत्यू झाला.
अहेरी तालुक्यातील कोरेली या दुर्गम गावातील अंकित तलांडी यांचा मुलगा आर्यन याची 23 जून रोजी मध्यरात्री प्रकृती खालावली. त्याला पोट दुखीचा त्रास होत असल्याने पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पेरमिली आरोग्य केंद्रात रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी अहेरी येथे नेण्यास सांगितले.
अशातच अशिक्षित पालकांना पेरमल्ली आरोग्य अधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन तसेच वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न करून दिल्याने नाईलाजास्तव पालकांनी आर्यनला घेऊन बसने रुग्णालयात जाण्यासाठी निघाले. हा बालक गंभीर अवस्थेत असतांनाही उपचार उपलब्ध न दिल्यामुळे वाटेतच बालकाची प्रकृती अधिक खालावली. यावेळी बस चालकानी वेळेचा विलंब न करता बस थेट आलापल्ली आरोग्य केंद्रात नेली. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे एका निष्पाप बालकाचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाच्या ढसाळ कार्यपद्धतीमुळे या भागात दरवर्षी अशा हृदयद्रावक घटना घडतात. पण, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व्यवस्थेत सुधारणा होण्याऐवजी अधिकच बिघाड होत असल्याचे चित्र आहे. या हलगर्जीपणामुळे एक निष्पाप बालकाचं मुत्यू झाला यासाठी पेरमल्ली आरोग्यच्या केंद्राचे आरोग्य अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावा. अन्यथा अहेरी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असे अहेरी तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष डॉ. अ.निसार हकीम यांनी म्हटले आहे .

