राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- शीळ गावातील घोळ गणपती मंदिर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका 30 वर्षीय विवाहित महिलेवर तीन नराधम गोरक्षकानी सामूहिक बलात्कार करून तिचे डोके जमिनीवर आपटून निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेतील गो रक्षक असलेल्या नराधम आरोपी शाम सुंदर शर्मा वय 62 वर्ष, संतोषकुमार मिश्रा वय 45 वर्ष, राजकुमार पांडे वय 45 वर्ष या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
शीळ गावातील घोळ गणपती मंदिर परिसरात 30 ते 32 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. काही नागरिकांनी याची तक्रार शीळ डायघर पोलिसांना दिली होती, माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस अधिकारी दाखल झाले त्यानुसार शीळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाने तीन पोलीस पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला असता, मंदिर परिसरातील गोशाळामध्ये सेवा करणाऱ्या दोन संशयित सेवकांना ताब्यात घेण्यात आले.
या सर्व नराधम आरोपींना पोलीस स्टेशन मध्ये आणून सखोल चौकशी केली असता, मुंबईत राहणाऱ्या श्याम सुंदर शर्माच्या मदतीने त्यांनी सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याची कबुली दिली. सदर शीळ डायघर पोलिसांनी नवी मुंबई परिसरातील जवळच्या पोलीस ठाण्यात या संदर्भात चौकशी केली असता, मृत महिलेच्या वडिलांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार, नवी मुंबई येथील सदर मृत महिला अक्षता कुणाल म्हात्रे वय 30 वर्ष घरगुती वादविवादाने तणावात होती. या तणावातून शनिवारी (ता. 6) सकाळी 10 वाजता ती शीळ गाव परिसरातील घोळ गणपती मंदिरात गेली होती. सदर महिला मंदिरातून परत न येता तिथेच थांबली होती. याच परिसरात वरील आरोपी दारू पीत बसले होते. सदर महिला एकटी असल्याने तिच्या परिसरात हे आरोपी दारू पीत बसले होते.
दरम्यान, महिला एकटी असल्याची दिसताच तिच्याशी गोड बोलून तिला चहात भांगेच्या गोळ्या मिसळून चहा प्यायला दिला. ती नशेत गेल्यावर तिच्यावर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. सदर महिला सकाळी शुद्धीवर आल्यावर तिने आरडाओरडा केला व ती पळून जात असताना आरोपींनी सदर महिलेस मारहाण केली. तसेच तिचे डोके जमिनीवर आपटून गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शीळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या सूचनेनुसार गुन्हे अन्वेषण पथकाने आरोपींवर कारवाई केली आहे.

