यंदा चांगले उत्पादन व शेतमालाला योग्य दर मिळावा म्हणून वारकरी शेतकर्यांचे विठुरायाला साकडे
युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन धापेवाडा:- सोमवार 22 जुलै रोजी गुरू पौर्णिमेच्या द्वितीयेला विदर्भाची पंढरी असलेल्या श्री क्षेत्र धापेवाडा येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी पहाटे 4.00 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व त्यांच्या पत्नी कांचनताई गडकरी यांचे हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी आमदार सुनील केदार, माजी खासदार कृपाल तूमाने,
भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, दिलीप धोटे, ऍड.प्रकाश टेकाडे, मंदिर ट्रस्टचे सचिव आदित्य पवार तथा ट्रस्ट चे पदाधिकारी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच मंगेश माले, चिंतामण रोहनकर व दिवाकर कडू यांची मुलाखत घेण्यात आली. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सचिव ईश्वर धुर्वे ग्राम विकास अधिकारी यांची यासंदर्भात मुलाखत घेण्यात आली कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महापूजेनंतर यात्रेकरूं करिता मंदिराचे प्रवेशद्वार खुले करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून असंख्य दिंड्या धापेवाड्याकडे कूच करतांना दिसत होत्या. पहाटे पासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रीघ लावली होती. यावर्षी पाऊस होत असल्याने चंद्रभागेला चांगले पाणी होते. याञेच्या रात्रीपासून ते दुपारपर्यंत सुमारे 150 दिंड्या विदर्भ पंढरीत दाखल झाल्या होत्या. तर चार लाखांवर भविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले. दर्शनासाठी भाविकांच्या रीघ लागल्या होत्या.
गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या चांगल्या पावसामुळे शेतकरी सुखवला असून वारकरी शेतकऱ्यांनी शेतात यंदा चांगले उत्पन्न व्हावे व मालाला बाजारपेठेत चांगला भाव मिळावा म्हणून विठूरायाकडे साकडे घालत होते. यावर्षी छोट्या मोठ्या वस्तूंची दुकानेसुद्धा फार कमी दृष्टीक्षेपात पडत होती. शेकडो स्वयंमसेवक भाविकांच्या सेवेत दिसत होते. आज दिवसभरात दुपार पर्यंत सुमारे तीन लाखांच्यावर तर रात्रीपर्यंत पुन्हा 80 हजार भाविक धापेवाड्यात दाखल होण्याची शक्यता मंदिर ट्रस्टच्या वतीने वर्तीविली होती. याकरिता मंदिर ट्रस्ट चे सर्व संचालक मंडळ सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले होते. कळमेश्वर सावनेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर एस टी महामंडळा कडूण याञा स्पेशल बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.
यात्रेची पार्श्वभूमी: येथील श्री संत कोलबास्वामी हे दरवर्षी पंढरपुरची अखंड वारी करायचे. गेली अनेक वर्षे पंढरपूरला गेल्यानंतर व्रुद्धावस्थेमुळे पुढे ते विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी पंढरपुरला जाऊ शकले नाही त्यावेळी विठ्ठलाने कोलबास्वामीच्या स्वप्नात येऊन येथील चंद्रभागेच्या किनारी उत्तर दिशेला असलेल्या बाहुली विहिरीत माझी मूर्ती असल्याचा दृष्टांत दिला. त्यानंतर बाहुली विहिरीतून विठ्ठलाची मूर्ती काढून मंदिराची स्थापना करून मूर्तीची पूजाअर्चा करा जेणेकरुन परिसरातील श्रद्धाळू दर्शन घेऊ शकतील असे, सांगितले कोलबा स्वामीनी उमाजी आबा खोलकुटे यांच्या उपस्थितीत विठ्ठल-रुख्मिनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून आजवर मोठ्या संख्येने भाविक श्रद्धेने येथे नतमस्तक होतात. मूर्ती स्थापनेचा तो दिवस बुधवार जेष्ठ शुद्ध द्वादशी शके १६६२ ई. स.१७४१ हा होता.
या कार्यक्रमाची रूपरेषा: यात्रेच्या दिवशी भाविक मंडळी स्नान करून मंदिरात पोहचतात येथे एकादशी, द्वादशी, त्रयोदशीच्या दिवशी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. महापूजा झाल्यानंतर मध्यरात्री कोलबास्वामी मठ, रघूसंत महाराजमठ, मकरंद महाराज पुरी मठ येथुन दिंड्या निघतात. त्यानंतर स्वयंभू विठ्ठल – रुक्मिणी समोरील चंद्रभागेच्या तीरी गोपालकाला करण्यात येतो. यावर्षी मोठया प्रमाणात भाविक मंडळी दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून नागरिकांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मंदिर ट्रस्टीचे सचिव आदित्य पवार व मंदिर संचालक मंडळातील सदस्य प्रयत्नरत आहेत.
यात्रा निमीत्ताने धापेवाड्यात प्रत्येक घरी पाहुणे तसेच दिंडी भजनी मंडळी आपला मुक्काम ठेवत असून ग्रामस्थ ही त्यांची आपल्या परी मनोभावे सेवा करतात. आषाढी एकादशीच्या पर्वावर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. २१ जुलैला वाळवंटातील काला तर २२ जुलैला देवळातील काला करण्यात आला. तसेच २५ जुलैला प्रक्षाळ पूजा होणार असून भगवंताला अभिषेक होईल व रात्री कीर्तन होणार आहे.
आषाढी पौर्णिमेनंतर द्वितीयेला सुरू होणारी यात्रा ही सतत सात दिवस चालते. यात दरवर्षी विविध गृह उपयोगी वस्तू, पूजेचे साहित्य, देवाधिकांच्या विविध धातूपासून बनविलेल्या मुर्त्या, लहान मुलांची खेळणी तसेच शेती उपयोगी अवजारांची मोठ्या प्रमाणात दुकाने लागत असल्याने शेतकरी तसेच गृहिणी या वस्तूंची खरेदी करतात.

