प्रवीण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील देवळी शहरातील बस स्थानकाचे बांधकाम गेल्या चार वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असून त्यामुळे विद्यार्थी व प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात जबाबदार लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासन मूग गिळून गप्प बसले असून त्यांना जागे करण्याकरिता युवा संघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी देवळीतील बसस्थानक आवारात चिखलात बसून चिखलफेक आंदोलन केले.
यावेळी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासन लोकप्रतिनिधी सह आगार प्रशासनाचा निषेध नोंदवत बसस्थानक आवारात चिखलात बसून चिखलफेक आंदोलन केले. हा चिखलफेक विद्यार्थी व प्रवाश्यांची गैरसोय करणाऱ्यांवर चिखलफेक आहे, लोकप्रतिनिधींच्या बेजबदारपणावर चिखलफेक, निर्लज्ज प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर चिखलफेक, भावनाशून्य जनप्रतिनिधी, सरकार व प्रशासनावर चिखलफेक असून निर्लज्ज प्रशासनावर प्रतिकात्मक चिखलफेक करून आंदोलन करण्यात आले.
देवळी शहरातील बस स्थानकाचे बांधकाम मागील चार वर्षापासून सुरु आहे. परंतु अजून पर्यंत काम पूर्ण झालेले नाही याबाबत देवळीतील अनेक नागरिकांनी तसेच सामाजिक संघटनांनी बस स्थानकाचे काम पूर्ण करण्यासाठी अनेक निवेदन दिले आणि शेवटी आंदोलनाची ही काम केले परंतु एसटी महामंडळ अधिकाऱ्यांचे केवळ पोकळ आश्वासन मिळाले आम्ही लवकरच काम चालू करू, ठेकेदार काम करत नाही, महिन्याभरातच काम पूर्ण करणार आहो, अशे अनेक आश्वासन देऊन वेळ काढून नेले. मागील चार वर्षांपासून देवळी तालुक्यातील नागरिक विद्यार्थी ऊन, वारा, पाऊसाचा सामना करीत जीवाची हाल अपेष्टा करून बस स्थानक समोर बसगाड्यांची वाट बघत उभे राहत असतात. परंतु या एसटी महामंडळाच्या निर्दयी प्रशासनाला वयोवृद्ध नागरिक व चिमुकले विद्यार्थ्यांनवर दया येत नाही का असा प्रश्न देवळीकर जनता करीत आहे.

