प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.20:- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात वर्धा बसस्थानकाला अ वर्ग बसस्थानकात नागपूर प्रदेशात व्दितीय क्रमांक प्राप्त झाला असून 5 लाख रुपये रोख, चषक व प्रशस्तीपत्र देऊन आगार व्यवस्थापकाला सन्मानित करण्यात आले.
मुख्यमंत्री तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्या मार्ग परिवहन महामंडळ यांच्या हस्ते दि.1 मे 2023 रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता.
दि.1 मे 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानात वर्धा बसस्थानक नागपूर प्रदेशात व्दितीय क्रमांक प्राप्त झाला. प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या हस्ते भंडारा येथे पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. यावेळी विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापक वर्धा, परिवहन महामंडळाचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय स्तरावर विभाग नियंत्रक यांचे अध्यक्षते खाली सर्वेक्षण समिती नेमुन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत समितीच्यावतीने प्रत्येक बस स्थानकाचे मुल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये बसस्थानकाची सखोल स्वच्छता, प्रसाधन गृहाची स्वच्छता, बसस्थानक व्यवस्थापन, हरीत बसस्थानक, नियमित करावयाची स्वच्छता, सखोल स्वच्छता, विविध महोत्सवाचे आयोजन या बाबीचे मुल्यांकन करुन गुणांकन देण्यात आले होते.
यावेळी मिळालेल्या बक्षिसाची रक्कम बस स्थानकाच्या विकास कामासाठी व वर्षभरात स्वच्छताबाबत उल्लेखनीय कामगिरी करणा-या कर्मचा-यांसाठी खर्च करण्यात येणार आहे. असे आगार व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

