श्याम भूतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना गॅस पाइप किंवा आतमध्ये मोठी तार असलेल्या जाड वायरची पिळवटी करून मारहाण करण्यात आली. साधारण एक ते दीड तास सलग मारहाण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही डोळ्यांसह डोके, पोट, छातीवर मारहाणीचे गंभीर व्रण उत्तरीय तपासणीत आढळून आले.
मंगळवारी (दि.10) रात्री केज उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय चमूने ही उत्तरीय तपासणी केली. संवेदनशील प्रकरण असल्याने खुद्द जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात केज रुग्णालयात थांबून होते. देशमुख यांचे सोमवारी (दि. 9) तीन वाजता टाकळी जवळील टोलनाक्यावरून अपहरण करण्यात आले.
त्यानंतर त्यांना एका वाहनात नेऊन मारहाण झाली. पुन्हा तीन तासांनी त्यांचा मृतदेह दैठणाजवळ टाकण्यात आला.मंगळवारी रात्री घटनेच्या 26 तासांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी करण्यात आली. यात संतोष देशमुख यांच्या छातीवर, पोटावर, डोक्यावर आणि डोळ्यांवर गंभीर प्रहार करण्यात आला. त्यामुळे शरीरातील आतल्या भागात रक्त साकाळून त्यांच्या मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी आढळले आहे.
संतोष देशमुख यांचे वाहन आडवून पाच ते सहा जणांनी त्यांना मारहाण करूनच अपहरण केले. वाहनातही त्यांना जबर मारहाण करण्यात आली. नंतर एखाद्या ठिकाणी वाहन थांबवून आरोपींनी मारहाण केल्याचा पोलिसांचा कयास आहे.

