प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १७:- खापरखेडा येथे अत्यंत मोलाचे काम मागील साठ-सत्तर वर्षांपासून विद्युत निर्मितीसाठी होत आहे. हा प्रकल्प सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये असल्यामुळे येथे कशा प्रकारे वीज निर्मिती होते हे जाणून घेण्याची मला निवडून आल्यापासूनच उत्सुकता होती. रणजीतबाबू देशमुख यांच्या काळात दोन संच येथे सुरू करण्यात आले होते. मी सुद्धा एक इंजिनियर असून माझ्या करिअरची सुरुवात मी इंडस्ट्रियल विभागातूनच केली. मी राजकारणामध्ये आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या काही सामाजिक अपेक्षा आपल्याकडं असतात. त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्लांट जास्तीत जास्त क्षमतेने चालावा. कमी खर्चात जास्त विद्युत निर्मिती व्हावी. हे आपल्या सर्वांचं मत आहे. हा प्लांट सुरळीत चालावा यासाठी आवश्यक अशी पावले एक आमदार म्हणून मी उचलण्यासाठी तयार आहे. यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊ.
कोलमाईन्सचा बेल्ट हा देखील सावनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. पीक हेडवर असलेला कोळसा इथे असल्यामुळे इथे विजेचा दर बाकीच्या प्लांटपेक्षा कमी असावा. वाजवी वाढ नसावी. कोराडी किंवा चंद्रपूर पेक्षा आपला प्लांट जास्त चांगल्या प्रकारे कसा चालेल, यासाठी आपण सर्वजण मिळून काम करू. मी आणि माझ्या कार्यकर्त्यांतर्फे सर्व प्रकारचे सहकार्य करू, असं मी आश्वासित करू इच्छितो. या थर्मल पावर स्टेशनमध्ये अजून नवे युनिट लागावेत, अशी आमची इच्छा आहे. इथे मुबलक जागा व पाणी उपलब्ध आहे. पिक हेडवर कोळसा उपलब्ध असल्यामुळे वीज निर्मिती प्रकल्पाचा विस्तार होत असेल, तर तो खापरखेडा येथे व्हावा. अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. इथे पर्यटन आणि इतर प्रकल्पांसाठी विजेची गरज आहेच. स्थानिकांच्या काही समस्या मला मागील पंधरा-वीस दिवसांमध्ये कळल्या. प्रदूषणाच्या बाबतीत जे जुने युनिट आहेत, ते प्रदूषण थांबवण्याच्या दृष्टीने व्यवस्थित करू शकलो तर त्याचा फायदा आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच सर्वांना होणार आहे.
कॉलनी, शाळांच्या माध्यमातून वेल्फेअर ऍक्टिव्हिटी सी.एस.आर. च्या साहाय्याने करता येईल का, हे या प्रकल्पाने बघावे. शाळांना आधुनिक करण्याच्या दृष्टीनेसुद्धा प्रयत्न करता येईल. खापरखेडा, चिचोली हे गावं ग्रामपंचायत आहेत, ते नगरपंचायत परिषद व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. ग्राउंड, जिम्नॅशियम, लायब्ररी यासाठी रहिवाशांना काही फायदा करून देता येईल का, हे सुध्दा बघावे. कंत्राटी कामगारांच्या काही मागण्या आहेत. नवे रोजगार कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून असो किंवा पूर्णकालीन कामगारांच्या माध्यमातून असो, त्यात स्थानिक लोकांना प्राधान्य असावे. लहान लहान गोष्टी सुद्धा मोठा समस्या निर्माण करतात. आपल्या कंव्हेअर बेल्टमध्ये उपोषणाची पाळी सुद्धा काही वेळा येते. आता मुख्यमंत्री हे आपल्या जिल्ह्याचे आहेत.ऊर्जामंत्री सुद्धा इथलेच राहू शकतात. त्यामुळे इथल्या समस्या त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचतात.स्थानिक लोकांना न्याय मिळावा आणि त्यांचे हित जोपासावे हिच अपेक्षा आहे.आधीच्या लोकांसारखी गुंडगिरी,अरेरावी, अहंकारी वृत्ती आमची नक्कीच नाही. स्थानिक लोकांकडे दुर्लक्ष होऊ नये आणि त्यांचे नुकसान होऊ नये, हीच आपल्याकडून अपेक्षा आहे असे वक्तव्य सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचे भाजपाचे नवनिर्वाचित आमदार डॉ.आशिषराव देशमुख यांनी केले. १७ डिसेंबरला महाजेनको खापरखेडा येथे औष्णिक विद्युत केंद्रात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बैठकीला उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलत होते. त्यांनी खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राची पाहणी केली. पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे अधिकाऱ्यांनी या केंद्राबद्दल माहिती दिली.
याप्रसंगी खापरखेडा येथील एमएसईबी कंपन्यांचे इंडिपेंडेंट डायरेक्टर विश्वास पाठक, डायरेक्टर ऑपरेशन संजय मुरुडकर, डायरेक्टर प्रोजेक्ट अँड फ्युल अभय हरणे, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर पंकज सातपुते, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर राजेश पाटील, चीफ इंजिनियर टीपीएस खापरखेडा विजय राठोड, भाजपाचे नेते डॉ.राजीव पोतदार, इतर अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिकांनी आपल्या समस्या या बैठकीत मांडल्या. त्यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

