राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील चुनाभट्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कुरेश नगरमध्ये गुरुवारी संध्याकाळी एका मुलीनं आपल्याच आईची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. गुरुवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास 40 वर्षीय रेश्माने आपल्याच जन्मदात्या 60 वर्षीय आई साबिरा बानो यांच्यावर चाकूने हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, साबिरा बानो यांचा जागीच मृत्यू झाला.
मृत साबिरा बानो या आपल्या मुलासोबत मुंब्रा परिसरात राहत होत्या. ती गुरुवारी कुर्ल्यातील कुरेशी नगरमध्ये मुलींना भेटण्यासाठी आली होती. साबिरा बानो यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे, त्यापैकी रेश्मा सर्वात लहान आहे. गुरुवारी आरोपी रेश्मा काझीचे आईसोबत काही कारणावरून भांडण झाले, त्यानंतर रेश्माने तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात साबिरा बानो यांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी साबिराला राजावाडी रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी रेश्माने पोलिसांना सांगितलं की, तिची आई तिच्यावर प्रेम करत नव्हती आणि तिच्या इतर बहिणींवर प्रेम करत होती. याच कारणावरून त्यांच्या घरात वारंवार भांडणं होत होती. घटनेच्या वेळी घरात फक्त रेश्मा आणि तिची आई होती. रागाच्या भरात रेश्माने हे भयानक पाऊल उचललं. या घटनेनंतर आरोपी रेश्माने स्वत: पोलीस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून रेश्माला अटक केली आहे. तिची चौकशी सुरू आहे. रेश्मा विवाहित असून, ती तीन मुलांची आई आहे. एकीकडे स्वत:चं संपूर्ण कुटुंब असताना आईवर असा आरोप करत हा हत्या केल्यानं सगळेच हादरले आहेत.

