मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
गडचिरोली :: गडचिरोली येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात भव्य मशाल मोर्चा व शेतकरी न्याय पदयात्रा तथा शेतकरी मेळावा पार पडला, या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांचे हक्क आणि विविध समस्या केंद्रस्थानी ठेवून आवाज उठवण्यात आला.
या पदयात्रेला काँग्रेसचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यामध्ये विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान, खासदार प्रतिभाताई धानोरकर, अखिल भारतीय काँग्रेस सचिव कुणाल चौधरी, आमदार रामदास मसराम, आमदार अभिजीत वंजारी, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार सुभाष धोटे, निरीक्षक सचिन नाईक, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, रवींद्र दरेकर, युवक काँग्रेस प्रदेश सचिव ऍड. विश्वजित कोवासे, प्रकाश इटनकर, माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, सतीश वारजूरकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्ष कविता मोहरकर यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, सेलअध्यक्ष, कार्यकर्ते, शेतकरी, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या, शासनाच्या उदासीन धोरणांवर कठोर शब्दांत टीका केली व शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे अनेक मुद्दे यावेळी प्रभावीपणे मांडण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, योग्य हमीभाव, वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान, सोलर पंप जोडणी, रस्त्यांची दुरवस्था, बेरोजगारी, पूरस्थितीचे कायमस्वरूपी समाधान, आरोग्य सुविधा, स्थानिकांना नोकरीत प्राधान्य, शासन योजनांतील अडचणी, उद्योगांच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेण्यात आली.
या भव्य पदयात्रेमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले असून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करीत राहील, असा निर्धार या माध्यमातून करण्यात आला.
*शेतकरी न्याय पदयात्रेतील प्रमुख मागण्या*
1. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊन योग्य हमीभाव देण्यात यावा.
2.. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रानटी हत्ती, वाघ, अस्वल, रानडुक्कर यांचा वावर वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी व शेत पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचा तातडीने कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा, व जास्तीत जास्त नुकसानभरपाई ५० हजार वरून, १ लक्ष रुपये करण्यात यावी किंवा नुकसान झालेल्या प्रमाणात भरपाई द्यावी, नुकसान भरपाईत शेतीच्या इतर साहित्यांचा समावेश नाही, फक्त ५ हजार रुपये देण्याची तरतूद आहे. शेतकऱ्याच्या सोलरपंपचा पनल हत्तीने तोडल्यास त्याची नुकसान भरपाई वास्तविक नुकसान झाल्याच्या अनुपातात देण्यात यावी.
3. शेतकर्यांना प्रति हेक्टरी बोनस जाहीर करण्यात आला होता, परंतु अजूनही बोनस देण्यात आले नाही. बोनस त्वरित देण्यात यावा.
4. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित आर्थिक भरपाई दिली जावी.
5. गडचिरोली जिल्हातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्याने, शेतकऱ्यांना सोलर पंपची सक्ती करण्यात आलेली आहे, परंतु सोलर पंप त्वरित लावून देण्यात येत नाही तसेच ते बंद पडल्यास कंपनी कडून सेवा मिळत नाही, करिता ज्या शेतकऱ्यांनी पूर्वीच डिमांडची रक्कम भरली आहे त्यांना वीज जोडणी देण्यात यावी व डिमांड रकमेचा परतावा देणे बंद करण्यात यावा व २४ तास वीज देण्यात यावी.
6. गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या विमानतळाकरिता सुपीक शेत जमिनी अधिग्रहीत न करता त्याऐवजी शहरालगत असलेल्या सायन्स कॉलेजच्या शेजारी पडीत व झुडपी जंगली जमीन अधिग्रहीत करावी.
7. उद्योग स्थापनेच्या नावाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात खरेदी केल्या जात आहेत. या प्रकरणांची चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा.
8. वनपट्टे न मिळालेल्या शेतकऱ्यांना सात पिढ्यांची अट शिथिल करून कायमस्वरूपी वनपट्टे द्यावेत.
9.गडचिरोली जिल्हातील सुरजागड प्रकल्पातून सुरु असलेल्या जड वाहतुकीमुळे जिल्ह्यातील रस्त्याची दुरावस्था होऊन जिल्ह्यात व गडचिरोली शहरात मोठ्या प्रमाणत अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. गडचिरोली शहरातून मुख्य रस्त्याने अवजड वाहनाने खनिजाची वाहतूक होत असते त्यामुळे अपघात होत असतात. या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागले आहे. असे पुन्हा घडू नये यासाठी शहराबाहेरुन बायपास करण्यात यावा. तोपर्यंत शहरातून खनिज वाहतूक बंद ठेवण्यात यावी.
10. अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे जिल्ह्यातील कोणत्याही निष्पाप नागरिकाचा जीव जावू नये म्हणून पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर, नर्सेस आणि आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात यावा.
11. गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून, सुरजागड व लाँयडमेटलच्या कोनसरी प्रकल्पामध्ये किमान ८० % स्थानिकांना नोकऱ्या देण्याचे धोरण असतांना त्याची पायमल्ली केली जाते. तसेच या बाबतची माहिती दिली जात नाही, ती उपलब्ध व्हावी. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी.
12. पावसाळ्यात गोसीखुर्द धरणातून सोडण्यात येणाऱ्या अति विसर्गाने व मेडीगट्टा धरणातील ब्याक वॉटरमुळे जिल्ह्यात दरवर्षी पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन शेतीचे व गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते हे नुकसान टाळण्याच्या अनुषंगाने प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात .
13. रोजगार हमी योजनांतील मजुरांचे मजुरी देयक, सिंचन विहिरीचे अनुदान, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान, शासनस्तरावर प्रलंबित असून तातडीने देण्यात यावे.
14. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत व कर्जाच्या योजनांत सुलभता देण्यात यावी.
15. मान्सून पूर्व जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गसह जिल्हा मुख्यालयाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचे तातडीने काम पूर्ण करण्यात यावे.

