अहेरीचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी ==
हा भीषण अपघात सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास लोकबिरादरी व प्राणहिता पोलीस कॅम्पच्या दरम्यान घडला. या अपघातात ऑटोमधील ८ प्रवासी जखमी झाले असून, यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
ऑटो उलटल्याने झाला थरार
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी ऑटो (क्रमांक एम एच 33 डब्ल्यू0048 अहेरीवरून आल्लापल्लीच्या दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने त्याला जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ऑटो रस्त्यावरच उलटला. धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला.
जखमींची नावे व प्रकृती
या अपघातात ऑटो चालक अब्दुल जाकीर शेख (वय ४१, रा. अहेरी) याच्या छातीला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यासह तनवीरजा गफूर शेख (वय २८, रा. अहेरी), हुसनबी सरवर शेख (वय ६०, रा. अहेरी), जमीला हसन शेख (वय ४७), ममता वेलादी (वय २५, रा. भंगारमपेठा), श्यामला येमुलवार (वय ३९, रा. अहेरी), शांता गडडमवार (वय ६५, रा. कोत्तुर) आणि मंगेश मेश्राम (वय ३७, रा. नवेगाव) हे जखमी झाले आहेत.
चंद्रपूरला केले रेफर
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत सर्व जखमींना तात्काळ अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, ऑटो चालकासह इतर तिघांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात संदर्भित (रेफर) करण्यात आले आहे.
यामध्ये ऑटो चालक अब्दुल जाकीर शेख,मंगेश मेश्राम,ममता वेलादी यांना चंद्रपूर ला रेफर करण्यात आले आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चैतन्य घावटे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

