मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यातील शारीरिक शिक्षण क्षेत्रातील पदवीधर व बेरोजगार युवकांच्या न्याय हक्कासाठी युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी गाडे यांनी विशेष शारीरिक शिक्षक भरती प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन दिले.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी बिंदू नामावली संदर्भातील प्रलंबित मुद्द्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. तसेच जिल्ह्यातील शारीरिक शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती तात्काळ अद्यावत करून रोस्टर तयार करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत भरती प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींवरही सखोल चर्चा करण्यात आली.
महासंघाच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत येत्या काही दिवसांत रोस्टर अद्यावत करून तयार करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. शारीरिक शिक्षक भरती प्रक्रियेत रोस्टर हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे अनेक वर्षांपासून भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला प्रत्यक्ष गती मिळेल, असा विश्वास महासंघाने व्यक्त केला.
या भेटीत अभिषेक कोपुलवार, अजिंक्य मडावी, तुषार धंदरे, अंकित नरोटे, चंद्रकांत वेलादी, करण पेंदाम, सुरेंद्र मळावी, निखिल हिचामी, केशव कोवासे, संतोष पुंगाटी, सर्वजित मंडल आणि प्रशांत कवळे यांचा समावेश होता. जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधवांच्या न्याय हक्कासाठी आणि भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण होईपर्यंत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

