मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला नक्षलमुक्त करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे आणि विकास प्रक्रियेत अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणारे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची बदली झाली असून,त्यांच्या जागी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम.रमेश यांची नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने नुकतेच याबाबतचे आदेश निर्गमित केले असून,निलोत्पल आता कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची धुरा सांभाळणार आहेत.
निलोत्पल हे गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ, म्हणजे तब्बल साडेतीन वर्षे पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत राहणारे अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ कार्यकाळात गडचिरोली पोलीस दलाने नक्षलविरोधी मोहिमेत ऐतिहासिक यश संपादन केले आहे.
त्यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलाने अत्यंत दुर्गम भागात नक्षलविरोधी कारवाया तीव्र केल्या होत्या. यामध्ये ५० हून अधिक जहाल नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले. तसेच, ‘आत्मसमर्पण’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शेकडो नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडला.
यातील सर्वात मोठे यश म्हणजे नक्षलवाद्यांचा ‘थिंक टँक’ आणि केंद्रीय समिती सदस्य असलेला कमांडर भूपती याचे आत्मसमर्पण. या घटनेने नक्षलवाद्यांच्या विचारधारेला मोठा धक्का दिला.एम.रमेश हे देखील जिल्ह्याच्या परिस्थितीशी पूर्णपणे परिचित आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अभियान) म्हणून त्यांनी जिल्ह्यात काम केले असल्याने नक्षलविरोधी अभियानाचा त्यांना दांडगा अनुभव आहे.
नवे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासमोर ‘नक्षलमुक्त गडचिरोली’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. सध्या गडचिरोली जिल्हा हा औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर असून, त्याचे ‘स्टील हब’ म्हणून रूपांतर होत आहे. या संक्रमण काळात उद्योगांना संरक्षण देणे.
स्थानिकांचा विश्वास संपादन करणे आणि उर्वरित नक्षली चळवळीचा पूर्णपणे बीमोड करणे, असा दुहेरी समतोल साधण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर असेल. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या सुरक्षेला नवीन गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
