मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी तालुका अंतर्गत येत असलेल्या मौजा – देवलमारी येथे सिरोंचा वन विभागांतर्गत प्राणहिता येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन दि. ०६ मे २०२६ रोजी देवलमारी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार *मा. डॉ. धर्मरावबाबा आत्राम* यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक मा. श्री. जी. पी. नरखने (भा.व.से.), सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक मा. श्री. एस. नवकिशोर रेड्डी (भा.व.से.) तसेच अहेरीचे उपविभागीय वन अधिकारी मा. श्री. विष्णूवर्धन रेड्डी (भा.व.से.) यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटन प्रसंगी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी पुढे म्हटले की, प्राणहिता वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना वनविषयक कामांसाठी दूरवर जावे लागणार नाही. या कार्यालयामुळे वनसंवर्धनाला चालना मिळून पर्यावरण संरक्षण अधिक बळकट होईल. तसेच वनाधिकार, स्थानिकांना रोजगाराच्या संधी आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने हे कार्यालय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक सक्रिय राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम साहेब, अरुण मुक्कावार, तालुका अध्यक्ष नागेश मडावी, सरपंच देवलमारी लक्ष्मण कन्नाके यांच्यासह कार्यकर्ते, गावकरी नागरिक आणि पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, या नवीन कार्यालयामुळे परिसरातील वनव्यवस्थापन अधिक सक्षम होणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
