मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
महागाव : प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल येर्रावार सर यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम मॅडम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल येर्रावार सर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शांतनू मुक्कावार सर तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता मजुमदार मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. लुबना हकीम मॅडम यांनी केले असून कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आरोग्य सेवक राशीद शेख यांनी केले.
प्रास्ताविकात डॉ. लुबना हकीम मॅडम यांनी डॉ. विशाल येर्रावार सर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी आपल्या सेवाकाळात रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत आरोग्य विभागात उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या शांत स्वभावामुळे आणि सहकार्याच्या वृत्तीमुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी बोलताना डॉ. शांतनू मुक्कावार सर यांनी डॉ. विशाल येर्रावार सर हे कर्तव्यदक्ष व सेवाभावी अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांनी आरोग्य विभागात काम करताना अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले असून त्यांच्या कार्याची प्रेरणा सर्व कर्मचाऱ्यांना मिळत राहील, असे मत व्यक्त केले.
डॉ. स्मिता मजुमदार मॅडम यांनी आपल्या भाषणात डॉ. विशाल येर्रावार सर यांच्या रुग्णांप्रती असलेल्या आत्मीयतेचे कौतुक केले. त्यांनी प्रत्येक रुग्णाला आपुलकीने सेवा देत आरोग्य विभागाची प्रतिमा उंचावली असल्याचे सांगितले.
निरोपाला उत्तर देताना डॉ. विशाल येर्रावार सर यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगितले. महागाव येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. येथे काम करताना सर्व सहकाऱ्यांकडून मिळालेल्या प्रेम व सहकार्याच्या आठवणी कायम स्मरणात राहतील, असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव अंतर्गत सर्व सेविका, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक, वाहन चालक, गटप्रवर्तक, आशा वर्कर, शिपाई तसेच कनिष्ठ सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शेवट उपस्थितांनी दिलेल्या शुभेच्छा आणि टाळ्यांच्या गजरात उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

