मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
भिवंडी/मुंबई:- मकर संक्रातीच्या पर्वावर सर्वत्र पतंग बाजी करण्यात येत आहे. त्यात नायलॉनच्या मांजाने परत एका व्यक्तीचा बळी घेतल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नायलॉनच्या मांजावर बंदी असतानाही त्याचा पतंग उडविताना सर्रास वापर कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रविवारी या नायलॉनच्या मांजाने शहरातील कल्याण नाका येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर वरून जाणाऱ्या दुचाकीचालकाचा बळी घेतला आहे. संजय कबीर हजारे वय 47 वर्ष, रा. उल्हासनगर असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.
कामानिमित्त मृतक संजय हजारे हे उड्डाणपुला वरुन जात असताना धारधार नायलॉनच्या मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर निघत होते. त्यांना जखमी अवस्थेत स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना उड्डाणपुलावर रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नवी बस्ती परिसरात घडली. शहर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.