रत्नु कांबळे, सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी
खेड:- भारत देश आज स्वातंत्र्याची पंच्यातरवी मोठ्या उत्साहात साजरी करण्याची तयारी करत आहे, हर घर तिरंगा म्हणत आहे, पण प्रत्येकाला आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजत आहे. सर्वांना आरोग्य सेवा कधी? हा भीषण वास्तव आहे. खेड तालुक्यातील खोपी मिर्ले येथून आपली आरोग्य सेवा कशी आहे याचे ज्वलंत प्रश्न समोर येत आहे.
खेड तालुक्यातील खोपी मिर्ले धनगर वाडीतील आजारी वृद्धेला पाच किलोमीटरची पायपीट करून डोलीतून रुग्णालयात न्यावे लागत आहे. दुर्गम भागात वसलेल्या धनगरवाडीतील रस्त्याचे बांधकामही अद्याप झाले नसल्याने येथून प्रवास करणाऱ्या रुग्णांची हेळसांड होते. रस्त्या अभावी योग्य वेळेत वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने रुग्ण दगावण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
कोकणातील हा तालुका डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात अशी काही गावे आहेत ज्या गावांचा आजही विकास झालेला नाही. रस्ता, पाणी, वीज या तीन जीवनाश्यक सुविधादेखील या गावांमध्ये पोहचलेल्या नाहीत. या दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. काही ठिकाणी तर दहा किलोमीटरची पायपीट करून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे. साहजिकच याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जावर होतो आहे. वस्तीवर जायला रस्ता नसल्याने वस्तीचा विकास खुंटला आहे. रुग्णाला रुग्णालयात न्यायाचे झाल्यास डोलीतून पाच ते सहा किलोमीटर अंतर जंगलमय भागातून पायपीट करून न्यावे लागते. त्यानंतर हमरस्त्यावर आणि तिथून पुढे रुग्णलयात जावे लागत आहे.
खेड तालुक्यातील खोपी मिर्ले येथील धनगर वाडी येथील एक वृद्ध महिला आजारी पडली, तिला तात्काळ वैद्यकीय उपचारांची आवश्यकता होती, मात्र वस्तीवर रस्ता नसल्याने या महिलेला रुग्णालयात पोहचवायचे कसे ? हा प्रश्न ग्रामस्थांसमोर होता. अखेर या वृद्धेला डोलीमध्ये बसवून पाच ते सहा किलोमीटर अंतर पायी चालून मुख्य रस्त्यावर आणण्यात आले त्यानंतर वाहनाने रुग्णालयात न्यावे लागले. काही ग्रामीण भाग आजही भौतिक सोयी सुविधांपासून वंचित आहे. अति दुर्गम भागात वसलेल्या धनगर वाडीवर जाण्यासाठी रस्ता व्हावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करत आहेत. गेल्या वर्षी या वाडीवर जाण्यासाठी रस्ता मंजूरदेखील झालेला आहे, मात्र अजूनही रस्त्याचे काम झाले नाही.