शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मैदानी खेळ आवश्यक: जिल्हाधिकारी विनय गौडा
सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो .9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर, दि. 20:– मानवी जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. खेळामुळे आरोग्य सदृढ राखण्या बरोबरच मानसिक क्षमतांचा विकास होत असतो. त्यामुळै दैनंदिन जीवनात शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी खेळासोबतच नियमित व्यायामाची गरज आहे. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंनी चागंल्या खेळाचे प्रदर्शन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी केले. ते जिल्हा क्रीडा संकुल येथे महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उदघाटन करतांना ते बोलत होते.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेसी, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रियंका पवार, उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो) पल्लवी घाटगे, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्याचे तहसीलदार, महसुल संघटनेचे अध्यक्ष शैलेश धात्रक, तलाठी संघटनेचे प्रकाश सुर्वे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, दोन वर्षानंतर जिल्हा स्तरीय महसुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खेळण्याने शारीरिक तसेच मानसिक प्रभाव पडत असतो. महसुल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दैनंदिन जीवनामध्ये ताण-तणावाखाली काम करावे लागते. यातून उद्भवणाऱ्या अनेक आजारांचा सामना करावा लागतो, त्यामुळे त्याचा परिणाम कामावर होतो. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मन व शरीर तंदुरुस्त राहून त्यांच्यात कार्य क्षमता वाढावी, यासाठी सुद्धा खेळणे आवश्यक आहे. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यामध्ये अनेक कला-गुण असतात. त्या कला-गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, खेळण्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. नेहमी शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सांघिक भावना वृद्धिगंत होण्यासाठी मैदानी खेळ उपयुक्त आहेत. खेळाचा फायदा हा दैंनदिन कामकाजात होत असतो. पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेसी म्हणाले, खेळाला नियमित वेळ देणे गरजेचे आहे. बालवयात व विद्यार्थी दशेत जसे आपण खेळलो तसे खेळाडूंनी खेळ भावनेतून खेळावे व खेळ भावना जपून खेळाचा आंनद घ्यावा, असे ते म्हणाले.
तत्पूर्वी जिल्हाधिका-यांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगे सोडून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. खुल्या प्रवर्गातील 100 मीटर पुरुषांच्या धावनस्पर्धेने क्रीडा महोत्सवाची सुरवात झाली. कार्यक्रमाचे संचालन तहसीलदार डॉ. कांचन जगताप यांनी केले. यावेळी महसुल उपविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.