✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी फारकत घेत नवीन सत्ता समीकरण बनवलं तेव्हा पासूनच शिवसेना कुणाची आणि शिवसेनेचं चिन्ह (सिम्बॉल) कुणाच यावरून राज्यात वाद सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील या वादाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. यादरम्यान आज शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा यावरून केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेली सुनावणी ३० जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोगासमोर आज झालेल्या दोन्ही गटाच्या युक्तीवादानंतर सोमवारी लेखी उत्तरे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या वादावर आता ३० जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी विजय आमचाच होईल असे म्हटले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, निवडणुक आयोगाला लेखी उत्तर देखील देऊच. गेली सहा ते सात महिने घटनाबाहेर सरकार स्थापन झालं आहे असं देशात कधीही झालं नव्हतं. कायदे तोडून-मोडून हे सत्तेत आले आहेत. एका व्यक्तीच्या राक्षसी महत्वकांक्षे साठी देशाचं, राज्यचं आणि जनतेचं नुकसान होतंय एवढा प्रकार देशाने कधीच बघीतला नव्हता.
सामान्य नागरीक म्हणून विचार करा, ४० लोक गद्दारी करून दुसऱ्या पक्षात जातात तेथे गेल्या नंतर लाज आणि हिंम्मत ठेवून निवडणूकांना सामोरे जाणं गरजेचं असतं. कधीही निवडणूकीला सामोरे न जाता असं सरकार कधी स्थापन झालं नव्हतं त्यामुळे हे घटनाबाह्य सरकार आहे.
सुनावणीला पुन्हा पुढची तारीख मिळाल्यावरून बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, विजय आमचाच होणार, विजय सत्याचाच होतो. महत्वाचा प्रश्न हा आहे की, किती दिवस हा विषय आपण प्रलंबित ठेवणार आहोत. किती दिवस पुढची तारीख करत राहाणार आहोत?
देशातील कायदा संविधानाचा अनादर करून असं सरकार बसू शकतं का आणि एका राज्याला स्वतःच्या महत्वकाक्षेसाठी मागं नेऊ शकतं का? हा विचार समोरच्या पक्षाने करण्याची गरज आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. या सुनावणीच्या वेळी विजय आमचाच होईल कारण आपल्या देशात सत्य मेव जयते याला महत्व आहे सत्ता मेव जयते याला नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.