✒️राज शिर्के, मुंबई ( पवई ) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- शिवसेना पक्ष शिवसेना व निवडणूक चिन्ह ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे या वादावरील सुनावणी आता 30 जानेवारीला होणार आहे. शुक्रवारी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापला युक्तिवाद केला. त्यानंतर निवडणूक आयोगानं दोन्ही बाजूंना येत्या सोमवारी लेखी उत्तर देण्यास सांगितलंय.
त्यानंतर 30 जानेवारीला पुढील सुनावणी होणार असून त्या दिवशी निकाल येण्याची दाट शक्यता आहे. त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार आहे. याबाबत उद्या शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडं त्यांची भूमिका मांडली जाणार आहे.
याबाबत शिवसेना नेते व आमदार अनिल परब यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाला हात लावायची हिंमत कोणातही नाही अशी प्रतिक्रीया दिली. निवडणूक आयोगाचा इलेकशन कमिशन निकाल काहीही लागला तरी उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत आणि पक्षप्रमुखच राहणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
माध्यमांशी बोलताना परब पुढं म्हणाले, या सगळ्या तांत्रिक बाबी आहेत. त्या तांत्रिक बाबींना आम्ही जास्त महत्व देत नाही. त्याची जी लढाई आहे ती निवडणूक आयोगासमोर चालू आहे. उद्धव ठाकरे हे आजही आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि उद्याही राहतील. निवडणूक आयोगासमोर फक्त औपचारिक मुद्दा आहे. शिवसैनिक जोपर्यंत मानतोय, तोपर्यंत त्यांच्या पक्षप्रमुख पदाला हात लावायची हिंमत कुणातच नाही, असा इशारा परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेता दिला.

