✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- सध्या बॉलीवुडमध्ये चर्चा आहे ती, राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘गांधी गोडसे – एक युद्ध’ या सिनेमाची. महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे हे दोन विषय जेव्हा जेव्हा समोर आले आहेत तेव्हा वाद, चर्चा होणे अटळ असते. गांधींच्या मारेकऱ्याची ही गोष्ट राजकुमार संतोषी मोठ्या पडद्यावर साकारणार आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, या निमित्ताने आता रोज नवा वाद समोर येत आहे.
‘गांधी गोडसे – एक युद्ध’ हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटावरुन गांधी वादी आणि कट्टर हिंदुत्ववादी चांगलेच भडकले आहेत. गांधींना चुकीचं दाखवू नका असा रेटा गांधीवादी धरतायत तर नथुरामला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाल्यास चित्रपट बंद पाडू असा इशारा कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. अशातच या चित्रपटाविरोधात नुकतच मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आलं.
अंधेरी येथे ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात सात ते आठ तरुणांनी गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणांनी या वेळी राजकुमार संतोषी यांच्याविरोधात घोषणाबाजी करून तिरंगा आणि काळे झेंडे फडकावले. पुढे विरोध इतका वाढला होता की निर्मात्यांना पोलिसांना बोलवावं लागलं.
दरम्यान, या प्रकाराबाबत राजकुमार संतोषी म्हणाले, की मी महात्मा गांधी, भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अनुयायी आहे आणि राहीन. आधी तुम्ही ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट पाहा आणि मला माझ्या चुका दाखवा. प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे, त्याचा गैरवापर करू नका. या चित्रपटाबद्दल मी चर्चा करण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले.