✒️राज शिर्के, मुंबई ( पवई ) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे, 26 जानेवारी:- शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आले होते. खासदार राजन विचारे यांच्याकडून धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त आयोजित मोफत महा आरोग्य शिबीराचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडलं. ठाणे दौऱ्यात उद्धव ठाकरे आनंद मठात जातील, असं सुरूवातीला सांगण्यात आलं, पण तिकडे न जाताच उद्धव ठाकरे मुंबईकडे रवाना झाले.
टेंभी नाक्यावर असलेलं आनंद मठ हे आनंद दिघे यांचं निवासस्थान आहे. आनंद मठ हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं मुख्य कार्यालय आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी तिकडे जाणं टाळलं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आनंद मठात न गेल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. ‘ते इथे आले नाही यावर आम्ही काय बोलणार? बाळासाहेबांनंतर जे नेतृत्व आलं त्यांचे पंख छाटण्याचं काम यांनी केलं. कधी त्यांची पुण्यतिथी दिसली नाही, जयंती दिसली नाही. गेली 10-12 वर्ष ते कधी आनंद मठात आलेले मला आठवत नाही,’ असं नरेश म्हस्के म्हणाले.
‘एकदा ठाणे मनपा निवडणूक होती तेव्हा ते आले होते तेव्हा निवडणूक होती म्हणून ते आले असतील. पोलीस बोलले होते उद्धव ठाकरे येणार होते, पण ते का आले नाहीत, याबाबत आम्हाला माहिती नाही. आमचं पक्ष कार्यालय आहे हे. आमच्याकडून विरोध का झाला असता?’ असा सवाल नरेश म्हस्के यांनी विचारला आहे.
‘आधी उद्धव ठाकरे जेव्हा यायचे तेव्हा जोरदार जल्लोष व्हायचा पण आज उद्धव ठाकरे जेव्हा ठाण्यात आले तेव्हाचे वातावरण पाहून खंत वाटली,’ अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी ठाणे दौऱ्यात एकनाथ शिंदेंवर टीका केली, तसंच ठाण्यात लवकरच विराट सभा घेणार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.