नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात तू-तू मैं-मैं सतत सुरू आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सतत झडत असतात आता आनंद आश्रमावर चागलच राजकारण तापत आहे. गेली ३० हून अधिक वर्ष टेंभी नाक्यावरील गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आनंद आश्रमात जयंतीनिमित्त दर्शनासाठी येण्या-जाण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना रोखण्यात आले नव्हते. आनंद आश्रमाला मिंदे गटाने नाव देवून आपले अस्तित्व टिकविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असून आनंद आश्रमात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू झाली आहे का ? असा सवाल शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे. शनिवारी शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने एक पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ठाणे जिल्हा शिवसेना प्रवक्त्यांनी मिंदे गटाचा निषेध केला.
धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंतीनिमित्त २६ जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाण्यात आले असताना आनंद मठाकडे पाठ फिरवली असा विरोधकांकडून आरोप केला जात होता. त्यांना प्रतीउत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा ठाण्यात येण्याचा नियोजित कार्यक्रम दौरा चार-पाच दिवसापूर्वी शिवसैनिकांना व पोलिसांना कळविण्यात आलेला होता. त्यामध्ये महाआरोग्य शिबिराला भेट देऊन, टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या असलेल्या पुतळ्याला अभिवादन करून जैन मंदिराच्या कार्यक्रमाला प्रस्थान करणार होते. असा नियोजित कार्यक्रम होता.
उद्धव ठाकरे ठाण्यात येणार त्याच दिवशी मिंदे गटाने आनंद आश्रमास त्यांच्या पक्षाचे नाव दिले असल्याचा आरोप यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आला. यावर ठाण्यातील शिवसैनिकांनी नाराजी दर्शवली असून या आनंदाश्रमाचे रूपांतर वातानुकूलित कॉर्पोरेट ऑफिस मध्ये करण्यात आलेले आहे. त्यामुळे या आनंद आश्रमाचे मूळ उद्दिष्ट नष्ट होत चाललेले आहे असा आरोप केला आहे.
ज्या आनंद आश्रमातून शिवसेना वाढली त्याच आनंदआश्रम मधून नगरसेवक, आमदार, खासदार, उद्योजक, तयार केले बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या, अन्याया विरुद्ध लढून त्यांना न्याय मिळवून दिला जात होता. हे पाहूनच त्या जागेचे पारसी असलेले मूळ मालक त्यांनी सदर जागा दिघे साहेबांना दिली होती.
हे आनंद आश्रम निष्ठावंत शिवसैनिकांचे आहे व राहणार यासाठी आम्ही कायदेशीर लढाई करून मिळवून घेऊ असे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख यांनी म्हटले आहे. आनंद आश्रम हे सर्व सामान्य शिवसैनिकाचे आहे. त्यामुळें आतापर्यंत त्याचे पावित्र्य जपले जात होते. मात्र आता त्याचे रूपांतर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये झाले असल्याने मुळ निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेसाठी ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, शिवसेना महिला आघाडी, रेखा खोपकर,समिधा मोहिते शिवसेना प्रवक्ते चिंतामणी कारखानीस, अनिश गाढवे आदि शिवसैनिक उपस्थित होते.