✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी भाजप नेत्यांवर आचारसंहितेचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. भाजपच्या एका कार्यक्रमात महिलांना पक्षाचा लोगो असलेल्या बॅग वाटण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय.
पुण्यात कसबा पेठ पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर या विधानसभा मतदारसंघात आज एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भाजपचे हेमंत रासणे यांनी महिलांसाठी हळदी-कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता भाजपकडून महिलांना भेट दिलेल्या वस्तूंच्या बॅगवर पक्षाचे चिन्ह होते. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याची मागणी होते आहे.
आचारसंहिता लागू झालेली असतांनासुद्धा भाजपचे झेंडे, लोगो लावण्यात येतात, भेट वस्तूसाठी पक्षाच्या चिन्हाचा पिशवी वापरली जाते आणि या कार्यक्रमाला भाजपचे महान नेते येतात. या सर्वांवर आचारसंहितेचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी केली आहे.
पुण्यात आयोजित या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ उपस्थित होते. तरीही आचारसंहितेचा भंग झाल्याचे आरोप होत आहेत.
राज्यातील रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोट निवडणूक होणार आहे.