✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर : जिल्हातून एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. वेगात आलेल्या ट्रॅक्टरने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीला जाेरदार धडक दिली. त्यात दुचाकी वर प्रवास करणाऱ्या आईच्या कवेत असलेला चिमुकला सिमेंट राेडवर पडून त्याचा दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना खापा ता. सावनेर) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर-खापा मार्गावरील काेदेगाव (ता. सावनेर) शिवारात बुधवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान घडली.
या अपघातात राेहित देवेंद्र शिवणकर वय 3 महिने असे मृत चिमुकल्याचे नाव असून, जखमींमध्ये राेहितची आई मीनाक्षी देवेंद्र शिवणकर वय 23, रा. करंभाड, ता. पारशिवणी मामा आशिष रामाजी चंदनकार वय 26 वर्ष आणि मावशी पूजा रामाजी चंदनकर वय 18, दाेघेही रा. काेच्छी, ता. सावनेर या तिघांचा समावेश आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिवारावर शोककळा पसरली आहे.
मीनाक्षी आजारी असल्याने ती आशिष व पूजासाेबत सावनेर शहरातील हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी आली हाेती. सायंकाळी तिघेही एमएच-४०/बीवाय-९५७१ क्रमांकाच्या माेटारसायकलने सावनेरहून काेच्छी येथे जात हाेते. ते काेदेगाव शिवारात पाेहाेचताच विरुद्ध दिशेने म्हणजेच खाप्याहून सावनेरला वेगात येत असलेल्या ट्रॅक्टरने माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यामुळे राेहित फेकला गेला व ताे सिमेंट राेडवर आदळला. यात त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली हाेती. शिवाय, तिघेही गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच हितेश बन्साेड यांनी घटनास्थळ गाठून चाैघांनाही जखमी अवस्थेत सावनेर येथील शासकीय रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती राेहितला मृत घाेषित केले, तर तिघांवर उपचार सुरू केले. याप्रकरणी खापा पाेलिसांनी ट्रॅक्टरचालकावरिुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.