🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी 🖊️
वर्धा:- हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला यशोदा नदीच्या पुराने वेढल्याने या गावाचा संपर्कच तुटला आहे. ही माहिती मिळताच हिंगणघाट तालुका प्रशासन तसेच पोलीस मुख्यालयातील बचाव पथकाच्या २५ व्यक्तींचे सहकार्य घेत बचाव मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. रात्री ७ वाजेपर्यंत ४० पैकी १५ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून उर्वरित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू होते.
सततच्या पावसामुळे यशोदा नदीच्या पाणी पातळीत कमालीचीच वाढ झाली. इतकेच नव्हे तर नदी ओसंडून वाहत असल्याने कान्होली या गावाचा संपर्कच तुटला आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने थेट बचाव कार्यालाच सुरूवात करण्यात आली आहे. या रेस्कू मोहिमेवर हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मसाळ यांचे लक्ष असून ते जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.