प्रा.डॉ पारस परमेश्वर जाधव.
श्रीमती एन एस पंतवालालकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड. जिल्हा सिंधुदुर्ग.
9421146216
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विशेष लेख:- भारतात ज्या महान स्त्रिया होऊन गेल्या, त्यांपैकी एक, माता रमाई भिमराव आंबेडकर यांचा दिनांक 7 फेब्रुवारी जयंती दिवस. माता रमाई यांचे पूर्ण नाव रमाबाई भिमराव आंबेडकर. होय, ज्या सूर्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या तेजस्वी प्रकाशाने संपूर्ण विश्वाला दखल घ्यायला भाग पाडले, आपल्या बुद्धिमत्तेच्या जीवावर, भारतातील ज्या ज्या लोकांना मानवी जीवन जगता येत नव्हतं, अशा लोकांना मानव म्हणून जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. अशा या महामानवाच्या, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई.
माता रमाबाई आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1897 रोजी कोकणातील दाभोळ जवळील वंणदगावच्या भिकू वलंगकर यांच्या गरीब कुटुंबात झाला. रमाबाई लहान असताना त्यांच्या आईचे आजारपणात निधन झाले. व काही दिवसात वडिलांचे हे निधन झाले. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या रमाईला, तिच्या तीन बहिणींना व एका भावाला घेऊन, रमाईचे काका व मामा मुंबईला आले. मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत राहायला गेले.
रमाई मोठी होत होती. पूर्वी लहान वयातच मुला – मुलींचे लग्न केले जायचे. सन 1906 रोजी, रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केट मध्ये झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय 14 वर्षे तर रमाईचे वय 9 वर्ष होते. पूर्वी रमाई ला रमी नावाने बोलवले जात होते. पण लग्नानंतर त्यांचे नाव रमाबाई झाले.
त्या काळात स्त्रियांना फार बंधनं होती. शिक्षण घेता येत नव्हते. महत्त्वाचे म्हणजे त्याचा, ज्या समाजात जन्म झाला. त्या समाजातील पुरुषांना शिक्षण फार दूर होते. मग स्त्रियांचे शिक्षण तर कोसो मैल दूर होते. क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांना गुरु मानणाऱ्या बाबासाहेबांनी रमाईला घरीच प्राथमिक शिक्षण देण्यास सुरुवात केली. बाबासाहेबांनी रमाईला सामान्य लेखन व वाचन शिकवले. डॉ. बाबासाहेब रमाईला, ‘रामो’ म्हणून हाक मारत होते. व रमाई बाबासाहेबांना साहेब म्हणून हाक मारत असत.
लग्नानंतर सहा वर्षांनी 12 डिसेंबर 1912 ला रमाई व बाबासाहेब यांना पहिला पुत्र प्राप्त झाला. त्यांचे नाव त्यांनी यशवंत असे ठेवले. रमाई व बाबासाहेबांचा संसार सुरू झाला होता. संसार चालवायचा म्हणजे नोकरी करणे गरजेचे होते. म्हणून जानेवारी 1913 मध्ये बाबासाहेब बडोदा राज्यात, सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाले. पण इकडे मुंबईत बाबासाहेबांच्या वडिलांची तब्येत बिघडत चालली होती. वडिलांच्या आजारपणामुळे बाबासाहेब यांना एक महिन्यात ती नोकरी सोडून परत मुंबईत यावे लागले. परंतु 2 फेब्रुवारी 1913 ला बाबासाहेबांच्या वडिल रामजी यांचे निधन झाले. बाबासाहेबांच्या वडिलांचा रमाई वर खूप जीव होता. आपल्या वडिलांची सेवा जशी करावी तशी रमाईने बाबासाहेबांच्या वडिलांची सेवा केली होती.
बाबासाहेबांचे वडिल रामजी यांच्या निधनानंतर उच्च शिक्षणासाठी बाबासाहेब परदेशात गेले. सन 1914 ते 1923 असे सुमारे नऊ वर्ष परदेशात शिक्षण घेण्यासाठी राहिले. बाबासाहेब अमेरिकेत होते तेव्हा रमाईंनी खूप कठीण दिवस घालवले. घरची परिस्थिती गरिबीची होती. घरात नोकरीला कोणी नव्हते. अशावेळी कुटुंब चालवणे म्हणजे एक तारेवरची कसरतच होती. पण या कठीण काळातही रमाबाईंनी कोणतीही तक्रार न करता मोठ्या संयमाने हसून दिवस काढले.
बाबासाहेबांना शिक्षणाची प्रचंड भूक होती. आणि अशा या कार्यासाठी रमाईने जी साथ दिली होती. त्याचे वर्णन करताना हा प्रकांड पंडित, बाबासाहेब तूस भर ही कमी पडत नाहीत. डिसेंबर 1940 मध्ये बाबासाहेब यांनी ‘थॉट्स ऑफ पाकिस्तानी’ हे पुस्तक लिहिले आणि ते केवळ त्यांची पत्नी रामो यांना समर्पित केले. बाबासाहेब लिहितात, मी हे पुस्तक रामोला त्यांच्या मनाची सात्विकता, मानसिक सदवृत्ती, सदाचाराचे पावित्र्य, माझ्यासह दुःख सहन करण्यात, संकटाच्या काळात जेव्हा आमचे मदतनीस नव्हते तेव्हा सहिष्णुता आणि संमती दर्शवण्यासाठी प्रशंसा स्वरूप भेट करतो.
बाबासाहेब आणि रमाई यांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते. बाबासाहेबांना प्रदेशात जाण्यासाठी स्कॉलरशिप मंजूर झाली होती. बाबासाहेबांचे परदेशी जाण्याचे जेव्हा निश्चित झाले, तेव्हा रमाई गरोदर होती. अशा परिस्थितीत सर्वसामान्य स्त्रीची रास्त अपेक्षा असते की, आपल्या पतीने आपल्या जवळ थांबावे. पण रमाई चे विचार अतिशय उच्च कोटीचे होते. रमाईने बाबासाहेबांना हसतमुखाने परदेशी जाण्यासाठी परवानगी दिली. बाबासाहेब परदेशी असताना, रमाईने एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव रमेश ठेवले होते. वैद्यकीय सुविधांच्या अभावी व गरिबीमुळे रमेशचा बालपणातच मृत्यू झाला.
बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन परत आले. त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव गंगाधर ठेवले होते. तोही अडीच वर्षाचा असताना, त्याचे निधन झाले. कारण सारखेच होते. त्या वेळची परिस्थिती सांगताना बाबासाहेब म्हणतात की, रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांनी, बाबासाहेबांना सांगितले की मृतदेह झाकण्यासाठी नवीन कापड आणावे. पण पैसे अभावी ते शक्य झाले नाही. अशावेळी रमाईने आपल्या साडीचा एक तुकडा फाडून दिला. आता फक्त त्यांना यशवंत नावाचा एकुलता एक मुलगा होता. पण तोही आजारी असायचा. यशवंतच्या आजारपणा मुळे माता रमाई चिंताग्रस्त होती परंतु तरी ही माता रमाईने बाबासाहेबांच्या अभ्यासात व कार्यात अडथळा येणार नाही याची काळजी घेतली. दरम्यान रमाई व बाबासाहेब यांना आणखी एक मुलगा झाला. त्या मुलाचे नाव त्यांनी राजरत्न ठेवले. बाबासाहेबांचे या राजरत्न वर खूप प्रेम होते. त्यानंतर रमाई यांनी आणखी एका मुलीला जन्म दिला. पण तिचे बालपणातच निधन झाले. कारण एकच, गरीबी व वैद्यकीय सुविधांचा अभाव, मुलांचा झालेला मृत्यू यामुळे माता रमाई खूप दुःखी होत्या. त्यांची तब्येत बिघडत चालली होती. त्यांना बरे वाटावे म्हणून, हवा पाणी बदलण्यासाठी यशवंत व राजरत्न या दोन्ही मुलांसोबत, माता रमाईला धारवाड येथे पाठवण्यात आले. पण सर्वात धाकटा मुलगा राजरत्न याचे ही 19 जुलै 1926 रोजी निधन झाले. बाबासाहेब यांना प्रचंड दुःख झाले होते. बाबासाहेबांनी 16 ऑगस्ट 19 26 रोजी त्यांचे मित्र श्री दत्तोबा पवार यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात बाबासाहेबांनी, त्यांच्या मुलांच्या मृत्यूने झालेल्या वेदना व्यक्त केल्या होत्या हे पत्र खूपच वेदनादायक आहे.
“आम्ही चार सुंदर रुपवान मुलं दफन केली आहेत. त्यातील तीन मुलगे आणि एक मुलगी होते. जर ते जिवंत असते तर भविष्य त्यांचे असते. त्यांच्या मृत्यूचा विचार करुन अंतःकरण दुखावतो. आम्ही फक्त आजीवन जगत आहोत. ज्याप्रकारे डोक्यावरुन ढग निघून जातात तसेच आमचे दिवस लवकर जात आहेत. मुलांच्या मृत्यूमुळे जीवनातील आनंद निघुन गेलं. आणि जसे बायबलमध्ये लिहिले आहे: “तू पृथ्वीचा आनंद आहेस.” जर हे पृथ्वी त्याग असेल, तर पृथ्वी आनंदित कशी असेल? “माझ्या परिक्त जीवनात मला पुन्हा पुन्हा असेच वाटते. पुत्रांच्या मृत्यूमुळे माझे जीवन अगदी काटेरी झुडुपेने भरलेल्या बागांसारखे आहे. आता माझे मन इतके भरले आहे की मी अधिक लिहू शकत नाही चारही मुलांच्या मृत्यूचे कारण धनाचा अभाव होता. ज्या काळात पोटच भरत नव्हते त्या काळात मुलांच्या आजाराच्या उपचारासाठी पैसे कुठून मिळतील. रमाबाई दिवसभर काम करून संध्याकाळी त्या घराबाहेर निघून जात व रस्त्याने गुरांचे पडलेले शेण एका टोपलीत भरून, टोपली डोक्यावर घेऊन घरी येत व त्याच्या गोवऱ्या थापून, सुकल्यानंतर विकून त्याच्यापासून येणाऱ्या पैशावर घर संसार चालवत होत्या. आजूबाजूच्या स्त्रिया म्हणायचे आगे तू बॅरिस्टर ची पत्नी ना? डोक्यावर टोपली घेऊन शेण गोळा करत काय फिरतेस? त्यावर त्या म्हणत होत्या, घरच्या कामात मदत करताना लाज कसली धरायची? माता रमाईला माहित होते की बाबासाहेबांना फार मोठे समाज कार्य करायचे आहे. बाबासाहेबांच्या सभांमध्ये माता रमाई ने ऐकले होते की, मला सात कोटी अस्पृश्य लोकांना गुलामगिरीच्या जोखडातून, साखळ दंडातून मुक्त करायचे आहे.. माता रमाईला माहित होतं की, यासाठी बाबासाहेबांना खूप पैसा लागणार आहे. बाबासाहेब बॅरिस्टर असल्यामुळे त्यांनी फक्त जर वकिली केली असती तर प्रचंड पैसा त्यांच्याकडे जमा झाला असता. आज कालचे जे शिकलेले लोक नोकरी करत आहेत ते बंगला, गाडी आणि कुटुंब एवढेच बघतात. त्यापेक्षा ही उच्च कोटीचे जीवन माता रमाई व बाबासाहेब, कुटुंबासह आनंदी जीवन जगू शकले असते.
माता रमाई जेव्हा आजारी पडल्या, तेव्हा शेवटच्या काळामध्ये, बाबासाहेबांच्या मित्रांनी नातेवाईकांनी बाबासाहेबांना सल्ला दिला. की तुमचे हे कार्य थांबवून रमाईजवळ थांबावे. पण बाबासाहेब या सर्वांची समजूत काढताना म्हणायचे की, माझ्या पत्नीच्या आजाराशिवाय या देशात सात कोटी अस्पृश्य लोक आहेत. जे रमाई पेक्षा शतकानु शतके आजारी आहेत. ते अनाथ आणि असहाय्य आहेत, त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही. मी या सात कोटी अस्पृश्यांसाठीही काळजीत आहे? रामो ला याची जाणीव असावी? म्हणून तिने मला सांगितले आहे की माझी काळजी करू नका. असे सांगून बाबासाहेबांचा गळा भरुन आला होता. माता रमाई बराच काळ आजारी राहिल्या आणि शेवटी 27 मे 1935 रोजी जेव्हा बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर कोर्टातून परत आले तेव्हा रमाबाईंनी बाबा साहेबांना स्वत: कडे इशार्याने बोलावले त्यांच्या हातात हात देत म्हणाल्या की, पाहा, मला वचन द्या की माझे निधन झाल्यानंतर आपण निराश होणार नाही, आपली मुले जगू शकली नाहीत, मात्र समाज आपले स्वतःचे मूल आहे; मला वचन द्या की तुम्ही त्यांना ब्राह्मणवादी व्यवस्थेतून मुक्त कराल, असे सांगून माता रमाबाईंनी डॉ. आंबेडकरांना सोडून या जगाचा निरोप घेतला. रामाताईंच्या निधनामुळे डॉ. आंबेडकर तीव्र शोकग्रस्त झाले.
बाबासाहेब जे शिक्षण घेऊन मोठे झाले. त्या शिक्षणाच्या जीवावर, अस्पृश्य जनतेला मानव म्हणून जगण्याचा अधिकार तर मिळवून दिलाच. पण भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला संविधान सारखा महान ग्रंथ भेट देण्याचं कार्यही झाले. ते केवळ शिक्षणामुळेच. अशा या महामानवाच्या शिक्षणासाठी, आपल्या स्वप्नांची, अपेक्षांची, हौसेची आहुती देणाऱ्या महान मातेला, रमाईला रोप्य महोत्सवी 125 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

