✒️ नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
मोबा नंबर 9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- महाराजा सयाजीराव हे प्रज्ञावंत राजे होते, त्यांनी समाजसुधारणा, दुष्काळ निवारण, शिक्षण इ. क्षेत्रामध्ये कालातीत कायदे केले. त्यांनी अनेक महापुरूषांना, स्वातंत्र्यसेनानींना मदत केली. त्यांच्याशिवाय स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास पुर्ण होवू शकणार नाही असे प्रतिपादन करीत महाराष्ट्र सरकार सयाजीराव गायकवाड यांचा जीवनपट ग्रंथ स्वरुपात प्रकाशित करून त्यांचे कर्तृत्व जनतेसमोर आणते आहे याचे मनस्वी समाधान वाटते असे वक्तव्य ज्येष्ठ चरित्रकार प्रख्यात साहित्यिक बाबा भांड यांनी रविवारी 05 फेब्रुवारी रोजी ठाण्यात केले.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या (6 फेब्रुवारी) पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला ठाणे महानगर पालिकेच्यावतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून व्याख्यानमालेचे आयोजन हार्बर हॉल, टीपटॉप प्लाझा येथे करण्यात आले होते. यावेळी आधुनिक भारताचे शिल्पकार महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जीवनपट ज्येष्ठ चरित्रकार प्रख्यात साहित्यिक प्रा. बाबा भांड यांनी रसिकांसमोर उलगडला. या कार्यक्रमास ज्येष्ठ लेखक अशोक चिटणीस, डॉ. शुभा चिटणीस, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक पत्रकार श्रीकांत बोजेवार, लेट्स रीड इंडियाचे प्रकुल्ल वानखेडे यांच्यासह ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनी पुस्तके भेट देवून प्रा. भांड यांचा सन्मान केला.
प्रा. भांड यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याचे, पुरोगामी विचारसरणीचे अनेक दाखले सादर करत त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी अनेक क्रांतीकारकांना मदत केली, त्यांनी त्यावेळी सुमारे 89 कोटींच्या (आजच्या काळानुसार सुमारे 2 लाख 90 हजार कोटींच्या) शैक्षणिक शिष्यवृत्या दिल्या. त्यांनी अनेक पुरोगामी कायदे केले, त्यांनी केलेले कायदे हे तत्कालीन युरोप आणि अमेरिकेच्या पुढे होते, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही नमूद केले होते. महाराजा सयाजीराव यांनी जात, पात, धर्माच्या भिंती पाडल्या, त्यांनी पुरोहितांसाठी कायदा केला होता, दुस-या धर्म परिषदेचे ते अध्यक्ष होते, वडिलांच्या संपत्तीत मुलीलाही अधिकार असल्याचा कायदा त्यांनी त्यावेळी केला, संन्यास घेण्यासाठीही कायदा केला, अशा अनेक अद्भभूत गोष्टी महाराजा सयाजी गायकवाड यांनी केलj असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना बाबा भांड म्हणाले, हिंदुस्थानातील एकमेव सार्वभौम राजे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा अद्भुत प्रवास भारतीय इतिहासातील दडलेले एक सोनेरी पानच आहे. शिक्षण हेच प्रगती परिवर्तनाचे एकमेव साधन आहे या जाणिवेतून सयाजीराव प्रत्येक गोष्ट चिकाटी आणि जिद्दीने शिकत गेले. ग्रंथवाचन हे शिक्षण ओळखीचे एक अंग आहे, हे ओळखले ल्या तरुण राजांची ग्रंथांशी मैत्री वाढत गेली. आयुष्यभर नव्या गोष्टी सयाजीराव चिकाटीने शिकत गेले. जनकल्याण आणि जनतेच्या सेवेसाठी त्यांनी तरूणपणीच जगभरातील प्रशासन पध्दतीचा अभ्यास केला. अस्पृश्य आदिवासी मुलांसाठी सरकारी खर्चाने निवासी शाळा सुरू केल्या. हिंदुस्थानातील अस्पृश्योद्धाराची पायाभरणी केली. तसेच राज्यातील मुलामुलींसाठी सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण सयाजीरावांनी सुरु केले. सुप्रशासन, न्याय, शेतीउद्योगांना मदत, सामाजिक, धार्मिक सुधारणा, जाती-धर्मातील भेद दूर करत मानवता आणि सर्वधर्म समभावाचा मार्ग निवडत सयाजीराजा गायकवाड यांनी भारतात अनेक क्षेत्रात आपले वेगळेपण दाखवून दिले असल्याचे बाबा भांड यांनी नमूद केले.
सुप्रशासनातून जनसेवा, जातपात धर्मापलीकडचा दानशूरपणा, शिक्षण आणि सामाजिक सुधारणांची सांगड सयाजीरावांनी घातली. सयाजीराव हे एक उत्तम प्रशासक, लेखक, दानशूर, सुधारक, पुरोगामी, ज्ञानात्म प्रबोधनाची कास धरणे, जनसेवेतच आपला मोक्ष शोधणारे प्रज्ञावंत राजा होते. सयाजीरावांचे लेखन, दुष्काळाच्या नोंदी, भाषणे, पत्रव्यवहार, हुकुम, प्रशासकीय अहवाल ही सगळी सामुग्री आपल्या देशाचा अनमोल वारसा असल्याचे बाबा भांड यांनी नमूद केले.
महाराजा सयाजीरावांवरील पहिल्या टप्प्यातील पंचवीस खंडांच्या साहित्य प्रकाशनाची आखणी स्वत: केल्याचे बाबा भांड यांनी सांगितले, या खंडांच्या माध्यमातून सयाजीरावांच्या प्रशासन, जनकल्याणाच्या कामासोबत साहित्य कला या सांस्कृतिक कामासाठी आदर्श ठरावे असे काम झाले आहे. पंचवीस खंडातील 62 ग्रंथांच्या 26642 पानांच्या सांस्कृतिक वारसा संवर्धन प्रकल्पातील हा केवळ सुरूवातीचा टप्पा असून अजून खूप काम बाकी असल्याचेही श्री. भांड यांनी नमूद करीत सांस्कृतिक जबाबदारीच्या प्रकाशन प्रकल्पात अल्पसा वाटा उचलण्याची संधी शासनाने दिल्याबाबत शासनाचा आभारी असल्याचेही ते म्हणाले.
महाराजा सयाजीरावांचे सर्व क्षेत्रातील कार्य हे डोंगराएवढे आहे. महाराजा सयाजीरावांचे कार्य कर्तृत्व ऊर्जादायी आणि सकारात्मक असल्याचे श्री. बाबा भांड यांनी नमूद केले. ठाणे महापालिकेने सयाजीरावांवर व्याख्यान आयोजित केल्याबद्दल त्यांनी महापालिकेचे आयुक्त् अभिजीत बांगर यांचे आभार व्यक्त केले.वॉटर, मिटर आणि गटर हीच महापालिकेची कामे असल्याचे चित्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये असते. या क्षेत्रात अधिक चांगले काम व्हावे, या सुविधा अधिक चांगल्या दर्जाच्या नागरिकांना मिळाव्यात यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील राहणारच आहे. याचबरोबर कुठल्याही शहराचे सांस्कृतिक आरोग्य चांगले रहावे ही सुद्धा महानगरपालिकेची जबाबदारी असते, या सांस्कृतिक प्रवासात सूक्ष्म धागा ही वाचन संस्कृतीचा असतो. ठाणे महानगरपालिका अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवित असून इतर संस्थाही शहराची सांस्कृतिक ओळख विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून टिकवित आहेत. महापालिकेच्या वतीने थोरामोठ्यांच्या जयंत्या साजरा केल्या जातात. परंतु त्यांची शिकवण आपल्याला माहित व्हावी, तरूण पिढीला व्हावी, त्यांचे विचार प्रगल्भ करण्याच्या भावनेतून व्याख्यानमालेसारखे उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रास्ताविकात नमूद केले. तसेच ज्येष्ठ साहित्यिकांचे विचार हे सर्वंदूर पोहचावेत यासाठी यापुढे व्याख्यानमाला यूट्यूब, फेसबुकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले.