🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी🖊️
वर्धा:- जिल्हात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे, जनजीवन विस्कळीत झाले असून काही गावांचा शहरांसोबतचा संपर्कही तुटल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील कुटकी गावाजवळून वाहत असलेल्या वणा नदीच्या पुराच्या पाण्यात हनुमानाची मूर्ती वाहत आली होती. ही वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरताच गावकऱ्यांनी मूर्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट तालुक्यातील कुटकी येथील रहिवासी मनोहर भुते हे वणा नदी परीसरात गेले असता त्यांना पाण्यात हनुमानजींची मूर्ती दिसली. त्यावेळी गावातील नागरिकांना त्यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहातही सरळ उभी असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मूर्ती नेमकी कोठून वाहत आली, किंवा परिसरात आजूबाजूच्या ठिकाणी कुठे मंदिर होते का, याची अद्याप कुठलीही स्पष्टता झाली नाही. मात्र, मूर्ती वाहत आल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.