गोंदिया जिल्हा प्रतिनिधी
गोंदिया:- गोंदिया जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने जिल्हा हादळला आहे. ही घटना दवनीवाडा पोलिस स्टेशन हद्दीत समोर आली आहे.
दवनीवाडा पोलिस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर 26 वर्षाच्या युवकाने अनेक आमिष दाखवून सतत लैंगिक अत्याचार केला. यात ती अल्पवयीन मुलगी चार महिन्याची गर्भवती झाली. यानंतर तरुणाने गर्भपाताच्या गोळ्या देत तिचा अवैध रित्या गर्भपात केला. मात्र यामुळे मुलीची प्रकृती गंभीर झाली आहे. याप्रकरणी दवनीवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.
आरोपी युवक आणि पीडित अल्पवयीन मुलगी हे दोघे घरा शेजारीच राहतात. या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. याच प्रेमसंबंधातून मुलगी गरोदर राहिली. मुलगी गरोदर राहिल्याचे कळताच आरोपी तरुणाने तिला मेडिकलमधून डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या गोळ्या खरेदी करुन दिल्या. या गोळ्या खाल्ल्यानंतर अर्धवट गर्भपात झाल्याने मुलीची प्रकृती गंभीर झाली. यानंतर तिला उपचारासाठी गोंदियातील बाई गंगाबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी तरुणाला अटक केले आहे. मुलीची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरु आहेत.