✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा :- लोकांच्या एकतेने आपण कुठलाही प्रश्न सोडवू शकतो. एकतेत अमाप ताकत असते. असेच वर्धा जिल्हातुन एकतेमधून गावाच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याला मदत झाली. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी समस्या जाणवते. त्यासाठी पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे असते. तसेच भूजल पातळी वाढविण्यासठी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हाच चांगला उपाय मानला जातो. सरकारकडूनही भूजल पातळी वाढविण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. वर्धा जिल्ह्यातील मोर्चापूर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बंधारा बांधला आहे.
वर्ध्यातील इंद्रप्रस्थ न्यु आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण शिबीर अंतर्गत मोर्चापूर या गावातील विविध समस्या जाणून घेतल्या. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, पाण्याची समस्या गंभीर आहे. त्यामुळे गावातील पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधण्याची कल्पना पुढे आली. नंतर प्राध्यापक संदीप गिरडे यांच्याशी चर्चेत बंधारा बांधण्याचा निर्णय झाला.
गावातील लोकांच्या मदतीने व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून बंधारा बाधायाला सुरूवात केली. सर्व विद्यार्थ्यांच्या सामूहिक श्रमातून हे काम झाले. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठीही या सामूहिक श्रमदानाचा फायदा होणार असल्याचे विद्यार्थी सांगतात. तसे विद्यार्थ्यांनी यावेळी गावकऱ्यांना पाणी संवर्धनाचे महत्त्व सांगतिले.
या विद्यार्थ्यांनी एकत्र येत श्रमदानातून बांधलेल्या बंधाऱ्यामुळे उन्हाळ्यात जनावरांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच या बंधाऱ्यात पाणी आडून राहिल्यामुळे पाण्याची पातळी वाढण्यासही मदत होणार आहे. गावातील लोकांच्या पाण्याच्या प्रश्नही काही प्रमाणात सुटणार असल्याने या बंधाऱ्याचा गावाला फायदा होईल, असे नागरिकांचे मत आहे.