सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. ब्रम्हपुरी येथे राहणारे एक कुटुंब आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी चारचाकी वाहनाने मध्यप्रदेश येथील बैहर कुमादेही येथे जात असताना भीषण अपघात झाला या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना दि. 16 रविवारला पहाटेच्या सुमारास नेवरागावाजवळ घडली. अपघातातील परिवार श्रीनगर कॉलनी ब्रम्हपुरी येथील सेवानिवृत्त एस्टी चालक विजय बडोले यांचा असून अपघातात त्यांची पत्नी कुंदा बडोले वय 52 वर्ष मुलगा गिरीश बडोले वय 32 वर्ष, व विवाहित मुलगी मोनाली बडोले (चौधरी) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर विजय बडोले वय 62 वर्ष यांचा गोंदियातील रुग्णालयात आज दि. 17 सोमवारला मृत्यू झाला. इतर दोन चिमुकले व सून जखमी असून गोंदिया येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ब्रम्हपुरी येथील श्रीनगर कॉलनीतील रहिवासी सेवानिवृत्त बस चालक विजय गणपत बडोले हे आपल्या परिवारासह स्वतःच्या चार चाकी वाहनाने मध्यप्रदेश येथील बैहर कुमादेही येथे जात असताना किरणापुर नजिक नेवरागाव कला येथे एका दुचाकी वाहनास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा तोल गेल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन चारचाकी वाहनाने धडक दिली.
या भीषण अपघातात त्यांची पत्नी कुंदा बडोले, मुलगा इंजी. गिरीश बडोले, विवाहित मुलगी मोनाली चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. तर वाहनचालक सेवानिवृत्त विजय बडोले, यांचा गोंदिया येथे उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. सून बबिता बडोले, 3 वर्षीय हसित व 5 वर्षीय विदिशा दोन लहान चिमुकले नातवंड किरकोर जखमी असून त्यांच्यावर गोंदिया येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एकाच परिवारातील एकूण सहा जण प्रवास करीत होते. मृतकाचे शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह ब्रह्मपुरी येथे आणण्यात आले. ब्रह्मपुरी तालुक्यातील पहिली घटना आहे. मृतकांवर काल रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकाच कुटुंबातील चौघांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.