उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौध्द धम्म संस्कार संघ, सांगली श्रावस्ती विहार यांच्या वतीने क्रांतीबा जोतीबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. 11 एप्रिल ते दि.14 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दि.11 एप्रिल रोजी क्रांतीबा जोतीबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरवात तथागत भगवान बुध्द, जिजामाता, सावित्रीमाई, रमामाता, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित असणाऱ्या सर्व ज्येष्ठ उपासक, उपासिका यांच्या हस्ते करण्यात येवून त्रिसरण व पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे सर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे मा. उदय माळी उपस्थित होते.सदर कार्यक्रमास विहाराचे उपासक, उपासिका, बालक तथा बालिका उपस्थित होत्या.
दि.12 एप्रिल रोजी लहान मुली, महिला, पुरुष यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या गुणांचे दर्शन दाखवून दिले. त्यामध्ये 1) स्वागत गीत, 2) सामुहिक नृत्य, 3) कविता, 4) गायन, 5) भीम गीत,6) नाटिका, 7) पोवाडा, 8) पथनाट्य, 9) वेशभूषा, 10) एकांकिका 11) व इतर गुणदर्शन इत्यांदीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणारे विविध सादरीकरण घेऊन मुलांना वाव देण्यात आला.
दि.13 एप्रिल रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये लहान मुली, महिला, मुले यांनी सहभाग घेतला होता. तसेच आयु. दत्ता माणिक मागाडे यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन ही भरवण्यात आले होते. अतिशय अप्रतिम चित्रे काढण्यात आलेली होती. सदर प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळाला.
दि.13 एप्रिल रोजी रात्री 11.30 वाजता बौध्द धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहारापासून ते सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत नागवंशी सर यांनी शिवगर्जना दिली तर विजय लांडगे यांनी घोषणा दिल्या. त्यानंतर 2 जणांची रांग करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळया पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर पर्यंत कॅन्डल मोर्च काढण्यात आला. यावेळी प्रत्येकांच्या हातामध्ये कॅन्डल होती व सर्वजण घोषणा देत बाबासाहेबांना अभिवादन करणेसाठी जात होते. 12 वाजता बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विहाराचे 70 ते 80 उपासक, उपासिका, बालक तथा बालिका उपस्थित होत्या.
दि.14 एप्रिल रोजी सकाळी 9.40 ला विहाराच्या माजी अध्यक्षा, सोनूताई कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यांनतर सामुहित त्रिसरण पंचशील घेण्यात आले. त्यांनतर चळवळीतील लहान बालक प्रणीत यांने संविधान उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी डॉ.नामदेव कस्तूरे यांनी पाहुण्याची ओळख करुन दिली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आयु. प्रदीप आवटे सर, एम.डी. आरोग्य अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी मौलिक असे मार्गदर्शन केले. त्यांनी बाबासाहेब हे फक्त एका विशिष्ट समाजाचे नेते नव्हते तर ते अखिल मानव जातीचे नेते होते व अखिल मानव जातीच्या कल्याणाचे काम बाबासाहेबांनी केले असे मत मांडले.
त्यानंतर विहारामार्फत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्याच्या व विहाराच्या संचालिका यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धम्मभूमीचे निर्मोते आयु.सी.आर. सांगलीकर साहेब, उद्योजक रमाकांत दादा घोडके, विद्यमान नगरसेवक जगन्नाथ दादा ठोकळे, नगरसेवक संतोष पाटील, माजी महापौर व विद्यमान नगरसेविका कांचनताई कांबळे, प्रसिध्द दंतवैद्य व इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रस्तावीक आयु. चंद्रकांत चौधरी सर यांनी, व कार्यक्रमाचे आभार आयु.संभाजी माने सर यांनी व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयु. कुंदन जमदाडे सर यांनी केले.
यावेळी विहारामार्फत भव्य असे रक्तदान शिबीराचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी 34 रक्तदात्यांनी रक्तदान हे श्रेष्ठ हे समजून रक्तदान केले. रक्तदान केलेल्या 34 जणांना विहारामार्फत छोटीशी भेट वस्तू देण्यात आली. सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रावस्ती विहाराचे सर्व पदाधिकारी, संचालक, संचालिका, चळवळीतील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते, उपासक, उपासिका, बालक तथा बालिका मोठया संख्येने उपस्थित होते.