सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमाचे करण्यात येत आहे जंगी स्वागत.
लेखक :- प्रेमकुमार बोके
गुजरातच्या बिलकिस बानो बलात्कार व खून प्रकरणातील ११ आरोपींची नुकतीच गुजरात सरकारने मुक्तता केली आहे. सुटकेनंतर पेढे वाटून आणि गळ्यात पुष्पमाला घालून आरोपींचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. तसेच एका संघटनेने दोषींचा जाहीर सत्कारही केला. त्यामुळे देशात या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू आहे.त्यातच बिलकिस बानोचे आरोपी ब्राम्हण होते व त्यांच्यावर चांगले संस्कार होते असे विधान गुजरात सरकारच्या “त्या” समितीमधील एका आमदाराने केले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण बलात्कारासारख्या अक्षम्य गुन्ह्याकडून जात आणि धर्म याकडे डायव्हर्ट करुन देशात पुन्हा धर्माच्या नावाने अनागोंदी माजविण्याचा प्रयत्न होतांना दिसतो आहे. बलात्कारी आणि बलात्कारीत महिला यांची जात धर्म पाहून जर आता त्यावर निर्णय आणि चर्चा होत असेल तर येणारा काळ हा फार भयंकर आहे.त्यामुळे या अत्यंत गंभीर विषयावर सुशिक्षित वर्गाने आपले मत जाहीरपणे व्यक्त करणे गरजेचे आहे.
२००२ मधे जेव्हा गुजरात धार्मिक दंगलीमधे होरपळून निघत होता तेव्हा अनेक मुस्लिम परिवार जीव वाचविण्यासाठी प्रदेश सोडून जात होते.बिलकिस बानो सुध्दा आपल्या परिवारासह गाव सोडून जात असतांना तिच्या कुटूंबावर धर्मांधतेने पेटलेल्या काही लोकांनी हल्ला चढविला. त्यामधे बिलकिसच्या तीन वर्षाच्या मुली सहीत तिच्या कुटूंबातील सात लोक मरण पावले. बिलकिस ही पाच महिन्याची गर्भवती होती. तिच्यासह चार महिलांवर बलात्कार करण्यात आला, ज्यामधे तिची आई सुध्दा होती. शेवटी हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने सीबीआय कडे सोपविले आणि सीबीआयने ११ आरोपींना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर बिलकिस आणि तिच्या कुटूंबाला धमक्या देण्यात आल्या. पोस्टमार्टम रिपोर्ट बदलले गेले. धमक्यांमुळे तिला अनेकदा आपले घर बदलावे लागले. परंतु बिलकिसने आपला न्यायालयीन संघर्ष मोठ्या निकराने सुरूच ठेवला आणि आरोपींना शिक्षा झाली. १५ आॕगस्टला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन महिलांचा आदर आणि सन्मान झाला पाहिजे असे वक्तव्य केले.इकडे प्रधानमंत्र्यांचे भाषण सुरु असतांना दुसरीकडे मात्र त्यांच्याच पक्षाचे गुजरात सरकार, खून आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींची सुटका करते. फक्त सुटकाच होत नाही तर त्यांच्या सुटकेचा जल्लोष साजरा केला जातो. पेढे वाटून, हार घालून त्यांचा सत्कार होतो.याचाच अर्थ प्रधानमंत्र्यांच्या वक्तव्याला त्यांच्याच पक्षाचे लोक फारशी किंमत देत नसावे किंवा एकतर हे सगळे ठरवून होत असावे असा संशय घ्यायला बरीच जागा आहे.
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना आणि सर्वत्र देशभक्तीचा ज्वर अंगात भिनवलेला असतांना देशात सध्या ज्या घटना घडत आहेत आणि या जात्यांध व धर्मांध घटनांचे समर्थन करणारी जी एक विकृत टोळी देशभरात पसरली आहे त्यामुळे आम्ही अजूनही पाषाण युगात वावरत आहोत असा भास होतो आहे. राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात ८ वर्षाच्या इंद्र मेघवाल या विद्यार्थ्याने शिक्षकांसाठी असलेल्या पाण्याच्या माठाला स्पर्श केल्याने उच्चवर्णीय शिक्षकाने त्या छोटयाशा निष्पाप मुलाला बेदम मारहाण केली आणि शेवटी उपचारा दरम्यान त्या मुलाचा मृत्यू झाला. मुंबईत सीएसटी येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात प्राचार्य डाॕ.उर्मिला परळीकर तेथील आदिवासी मुलींना जातीवरुन शेरेबाजी करुन अत्यंत घृणास्पद वागणूक देतात.त्यामुळे भयभीत होवून मुली तक्रार करतात.अशी शेकडो प्रकरणे दररोज आपल्या देशात घडत असतात.त्यातील एखादे उजेडात येते आणि बाकीची सत्ता, संपत्तीच्या प्रभावात दबून जातात.त्यामुळे आता कुठे आहे जातीयवाद असे मोघम प्रश्न विचारणाऱ्या तथाकथित उच्चविद्याविभूषितांना या गोष्टी दिसत नाही काय ? बलात्कारीत पिडीतेलाही जाती आणि धर्माच्या चष्म्यातून पाहिले जात असतील व त्यानुसार तिचे मुल्यमापन होत असेल तर येणारा काळ अत्यंत चिंताजनक आहे.
जातीधर्माच्या नशेत लोकांना सतत झिंगवत ठेवणे हे कोणत्याही देशाच्या हिताचे नसते.विशिष्ट कालावधीनंतर त्याचे भयंकर परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतात. जगाचा हा इतिहास आहे. तरीसुद्धा अजूनही आम्हाला जातीधर्माच्या नावाने लोकांना भरकटविण्यात मनःशांती लाभत असेल तर त्याचा फायदा फक्त मोजक्याच लोकांना होईल. देशातील बहुतांश जनतेला मात्र अतिशय विदारक परिस्थितीला सामोरे जावे लागेल. कोणत्याही सत्ताधिकाऱ्यांना जनता जेव्हा सत्ता बहाल करीत असते,तेव्हा त्या सत्ताधिशांकडून जनतेला केवळ विधायक कामांची अपेक्षा असते. सरकारने देश लोकशाही मार्गाने पुढे न्यावा असेच भारतातील बहुतांश लोकांना वाटते. परंतु सत्तेचा वापर जर बहुतांश लोकांनाच मूर्ख बनविण्यासाठीच होत असेल तर एक दिवस जनता निश्चितच प्रश्न विचारत असते.जनतेची सहानुभूती जेव्हा संपते, तेव्हा कोणत्याही देशाचा श्रीलंका होत असतो. परंतु भारत त्या वाटेवर जावू नये असेच या देशावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकास वाटते. त्यामुळे अन्यायी, अत्याचारी, बलात्कारी लोकांचे उदात्तीकरण करणे आपण थांबविले पाहिजे आणि जात धर्म विरहीत समतावादी लोकशाहीच्या दिशेने आपल्या देशाची वाटचाल असली पाहिजे असे वाटते.
लेखक: प्रेमकुमार बोके राह. अंजनगाव सुर्जी
९५२७९१२७०६