विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
बोटा : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जांबूत परिसरातील मुळा नदीवर असलेल्या जांबुत- साकूर सीमेवर कोल्हापुरी पद्धतीच्या दिघे केटियरचे 44 ढापे चोरून नेल्याची घटना घडली. घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकूर परिसरात मुळा नदीवर साकूर व जांबूत या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा केटियर आहे. पावसाळ्यापूर्वी बंधार्याचे लोखंडी ढापे काढून ठेवले जातात. चालू वर्षी देखील या बंधार्याचे वापरायोग्य 225 ढापे काढून जांबूत हद्दीत ठेवण्यात आले होते.
5 मे ते 19 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपूर्वीच्या दरम्यान चोरट्यांनी यातील 1 लाख 10 हजार रुपयांचे वापरायोग्य 44 ढाप्यांची चोरी केल्याचे समोर आले. भाऊसाहेब बापू सागर यांचे फिर्यादीनुसार घारगाव पोलिस ठाण्यात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील यांचे मार्गदर्शनानुसार पोलिस हेड कॉन्स्टेबल आर.व्ही. भुतांबरे हे करीत आहेत. दरम्यान, काही दिवसांपासून चोरट्यांनी साकुर पठारभागात धुमाकूळ घातला आहे.
चोरांनी अशी कुठलीच बाब सोडली नाही की, त्याची चोरी करणे बाकी आहे.दरम्यान शेतकर्यांच्या उभ्या पिकांची देखील चोर चोरी करू लागले आहेत.त्यात सार्वजनिक संपत्ती देखील आता लक्ष होत असल्याचे या घटनेने समोर आले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे.